Pahalgam Terror Attack : पीडितांसाठी राज्य सरकार सरसावले, विशेष विमानाने पर्यटकांना परत आणणार; महाजन, शिंदे रवाना
esakal April 24, 2025 11:45 AM

मुंबई : काश्मिरात असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीला राज्य सरकार सरसावले असून ८३ पर्यटकांना घेऊन इंडिगोचे विमान मुंबईत पोहोचणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री काश्मीरकडे रवाना झाले तर मंत्री गिरीश महाजन दुपारीच तिकडे निघाले. नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी इंडिगोच्या मदतीने पर्यटकांसाठी हे विमान राज्याकडे पाठवण्याची सोय केली. श्रीनगर ते दिल्ली या प्रवासाचे तिकीट आज ३० हजार रुपये झाले असताना राज्य सरकारने मात्र मोफत प्रवासाची सोय केली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व यंत्रणा तातडीने कामाला लागल्या. या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला, त्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. मृत, जखमी आणि अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी देशभरातून मदतकार्याला वेग आला. महाराष्ट्रात महायुतीच्या मंत्र्यांनीही या कार्यात सक्रिय सहभाग घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांना समन्वयासाठी पुढे सरसावले. त्यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना मृतांच्या नातेवाइकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले. मृत संजय लेले, दिलीप डिसले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे मृतदेह श्रीनगरहून मुंबईत, तर पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे मृतदेह पुण्यात आणण्याचा निर्णय घेतला. मुंबई विमानतळावर मंत्री ॲड. आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरी मिसाळ यांना समन्वयाची जबाबदारी सोपवली. मंत्री गिरीश महाजन यांना अडकलेल्या पर्यटकांसाठी श्रीनगरला पाठवण्यात आले. तसेच, फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तत्परतेने पावले उचलली. मंगळवारी रात्रीच त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पथक श्रीनगरला पाठवले. या पथकाने मृतदेह आणि नातेवाइकांना विमानाने परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली. मुंबई विमानतळावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम, तर पुणे विमानतळावर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना समन्वयासाठी नेमले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या कामात मागे न राहता अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी अतिरिक्त विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ०२२- २२०२७९९० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली. अडकून पडलेल्या पर्यटकांशी समन्वय साधण्यासह त्यांना आवश्यक मदतीसाठी आपत्ती निवारण कक्षात विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे

मुंबई : पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांची सोय व्हावी व वाहतूक समस्येवर तोडगा काढणे तसेच अतिरिक्त गर्दीची व्यवस्था करण्यासाठी श्री माता वैष्णो देवी (एसएमव्हीडी) कटरा येथून नवी दिल्लीकडे जाण्यासाठी विशेष रेल्वेची सेवा सुरू करण्यात आली आहे.

काश्मिरात पर्यटकांसाठी मदतकक्ष

मुंबई : काश्मिरात अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी राज्य सरकारने मदत कक्ष स्थापन केला आहे. नागरिक ९३२१५८७१४३ या क्रमांकावर संपर्क साधू शकतील. मंत्रालय कक्षाचा टोल फ्री क्रमांक १०७० असा आहे.

वर्ध्यातील ४५ पर्यटक सुरक्षित

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील ४५ पर्यटक काश्मीर येथे गेल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ते सर्वच पर्यटक सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत संपर्क क्रमांक देण्यात आले असून जम्मू कश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाइकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.

काश्मीरमधील पर्यटनाला लागणार ब्रेक

नागपूर : जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी हल्ला झाला त्यावेळी उपराजधानीतील १५० पेक्षा अधिक पर्यटक त्या ठिकाणी होते. परंतु, सुदैवाने त्यापैकी कोणालाही हानी झाली नाही. मात्र, या हरल्यानंतर जिल्ह्यातील अनेक पर्यटकांनी जम्मू-काश्मीर दौरा रद्द केला, अशी माहिती पर्यटन कंपन्यांच्या संचालकांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामुळे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यातील १६२ पर्यटक सुखरूप

ठाणे : डोळ्यादेखत आपल्या प्रियजनांवर गोळ्या झाडताना पाहिले आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. ठाणे जिल्ह्यातील १६२ पर्यटक आता परतीच्या वाटेवर आहेत. ठाणे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार जम्मू-काश्मीर येथे सहलीसाठी गेलेल्या तीन जणांना दहशतवादी हल्ल्यात जीव गमवावा लागला असून अन्य १६२ पर्यंटक सुखरूप आहेत.

सांगलीत नामसाधर्म्यामुळे उडाला गोंधळ

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचाही मृत्यू झाला. मात्र, प्रसारमाध्यमांत त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर सांगलीतील याच नावाच्या ४९ वर्षीय ज्यूस विक्रेत्याच्या मोबाईलवर सातत्याने फोन येऊ लागले. त्यानंतर माझे नाव संतोष लक्ष्मण जगदाळे असे असून या हल्ल्यात संतोष एकनाथ जगदाळे यांचा मृत्यू झाला आहे, असे स्पष्टीकरण त्यांना द्यावे लागले. तेही पत्नी, मित्र व मित्राच्या पत्नीसह पहलगामला पर्यटनाला गेले होते. हल्ल्यापूर्वी तासभर आधी त्यांनी घटनास्थळ सोडले. तट्टूवरून फिरायला आवडत नसल्याने त्यांनी परतीचा निर्णय घेतला. त्यानंतर हॉटेलवर परतताच त्यांना या हल्ल्याची बातमी समजली. गावातील लोकांसह, नातेवाईक व पत्नीचे मंगळवारी रात्रभर व बुधवारी सकाळपर्यंत फोन येत होते. सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनाही जगदाळे यांच्याविषयी विचारणा करणारे फोन आले. त्यानंतर त्यांनीही हा संभ्रम दूर केला.

दहशतवाद्यांच्याच मार्गाने केला प्रवास

नागपूर : ‘‘दहशतवादी पहलगाममध्ये ज्या राजोरी मार्गाने आले, त्याच मार्गाने आम्ही काल प्रवास केला. त्यांच्या बंदुकीच्या गोळीचे आम्हीही लक्ष्य ठरू शकलो असतो. सुदैवाने आम्ही थोडक्यात बचावलो. आता श्रीनगरला सुरक्षित आहोत. शहरात संपूर्ण ठिकाणी संचारबंदी आहे. बाहेर पडणेही अवघड झाले आहे,’’ अशी आपबिती नागपूरचे ओमप्रकाश कुमेरिया यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितली. हा थरार सांगतानाच ते काही मिनिटे स्तब्ध झाले.

महात्मा ट्रॅव्हल्सचे संचालक असणारे ओमप्रकाश ४० जणांच्या पथकासह जम्मू-काश्मीरला पर्यटनासाठी गेले आहेत. त्यांच्यासोबत असणाऱ्यांमध्ये लहान मुलेसुद्धा आहेत.

ते म्हणाले, की १७ एप्रिल रोजी सहल रवाना झाली. १९ ला अमृतसरला पोहोचले. तिथून कटरामार्गे श्रीनगरला जाणार होते. २० एप्रिल रोजी रामबन येथे ढगफुटी आणि भूस्खलन झाल्याने पहाडातील रस्ताच वाहून गेला. त्यामुळे दोन दिवस कटऱ्याला मुक्काम करून २१ तारखेला तीन वाहनांतून कसेबसे दुसऱ्या मार्गाने वाट शोधत श्रीनगरला पोहोचलो. ज्या मार्गाने आम्ही श्रीनगरला पोहोचलो तेथून राजोरीचा मार्ग जातो. त्याच मार्गाने दहशतवादी पहलगामाला पोचले. त्यांनी पर्यटकांना लक्ष करून हत्या केली. ही घटना घडत असताना त्याचा मागमूसही आम्हाला नव्हता. श्रीनगरला पोहोचल्यावरच घटनेची माहिती कळाली आणि धक्का बसला. सुदैवाने आम्ही सुखरूप आहोत, हे त्यांनी सांगितलेले वर्णन अंगाचा थरकाप उडविणारे ठरले.

दैव बलवत्तर म्हणून आम्ही सुरक्षित’

चाळीसगाव (जि. जळगाव) : केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही आज गावापासून हजारो किलोमीटरवर सुरक्षित आहोत. पहेलगाम येथील बैसनूर व्हॅली येथे जेव्हा दहशतवाद्यांचा हल्ला झाला त्या ठिकाणाहून आम्ही आदल्या दिवशीच श्रीनगरमधील मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये आलो होतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा जाणार होतो. मात्र, रात्रीच आम्हाला हल्ल्याची घटना कळाली. तेव्हापासून आम्ही सर्व जण प्रचंड घाबरलो होतो. आता घरी कसे जायचे? असा मनात प्रश्न असताना हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांनी आम्हाला धीर दिला, ‘तुम्ही येथे सुरक्षित आहात काळजी करू नका’ असे सांगितले. तेव्हा आम्ही सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आता आम्ही पुढील प्रवास करायचे टाळले आहे, अशी आपबिती येथील रहिवासी, भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य देवयानी ठाकरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितली.

चाळीसगाव येथील देशमुख यात्रा कंपनीकडून माताजी ग्रुप असलेल्या या १४ जणांनी या यात्रेची अगोदरच बुकिंग केलेली होती. यात देवयानी ठाकरे या त्यांचे पती सोनूसिंग ठाकरे तसेच हिरापूर (ता. चाळीसगाव) येथील काही पर्यटक असे एकूण १४ जण आठ दिवसांपासून काश्मीरमध्ये आहेत. या हल्ल्याची माहिती समजताच आमदार मंगेश चव्हाण यांनी लगेचच देवयानी ठाकरे यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्यांना पुढील प्रवास न करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

पहलगामप्रकरणी काँग्रेसचा दादरमध्ये निषेध मोर्चा

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत काँग्रेस पक्षाने दादरमध्ये मोर्चा काढला. हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला असून हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करत दहशतवादाचा कायमचा बीमोड करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे पहलगाम हल्ल्यातील मृतांना दोन मिनिटे मौन राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व त्यानंतर मोर्चा काढण्यात आला. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘भारत माता

की जय’ अशा घोषणा देत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. यावेळी सपकाळ म्हणाले की, पहलगाम हल्लाप्रकरणी सरकारने सर्वपक्षीय बैठक घेऊन एकमुखी निर्णय घ्यावा. अशा प्रकारचा कोणताही दहशतवादी हल्ला खपवून घेतला जाणार नाही, हा संदेश यातून गेला पहिजे. या कठीण प्रसंगी आपण सर्व भारतीयांनी एकत्र येऊन या हल्ल्याचा निषेध केला पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले.

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. एवढा मोठा हल्ला होत असताना गुप्तचर विभागाला याची माहिती मिळाली नाही का, हे सुरक्षा यंत्रणेचे अपयश आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.