पहलगाममधील भ्याड हल्ल्याविरोधात निदर्शने
शिवसेना युवा सेनेच्या वतीने घोषणाबाजी
वाशी, ता. २४ (बातमीदार) : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड आणि अमानुष दहशतवादी हल्ल्याचा नवी मुंबई युवासेनेचे जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दहशतवाद्यांची आता केवळ निंदा करून भागणार नाही, त्यांच्यावर निर्णायक आणि ठोस कारवाई झालीच पाहिजे, असे स्पष्ट मत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आले. हल्ल्यामागील दहशतवादी संघटनांना कायमचा धडा शिकवण्यासाठी ठोस आणि धोरणात्मक पावले उचलावीत, भारताने याआधी सर्जिकल स्ट्राईक केलं, आता पुन्हा निर्णायक उत्तर देण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया या वेळी उपस्थितांनी व्यक्त केली. रॅलीदरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सरोज पाटील, उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, रोहिदास पाटील, महिला उपजिल्हाप्रमुख आरती विचारे, सुरेखा गव्हाणे, युवासेना जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख साईनाथ वाघमारे, अविनाश जाधव, दीपेश म्हात्रे, विधानसभा अधिकारी सौरभ शिंदे, शहरप्रमुख चेतन पाटील, भावेश पाटील, ममित भोईर, गितेन पाटील, तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
................
अतिरेक्यांना मदत करणारे स्लिपर सेल नष्ट करावेत
- शंकर संगपाळ, बजरंग दल
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : अतिरेक्यांना देशांतर्गत मदत करणारे स्लिपर सेल नष्ट करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बजरंग दल नवी मुंबई जिल्हा संयोजक शंकर संगपाळ यांनी येथे केले. जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरान घाटीमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कोपरखैरणे येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
शंकर संगपाळ म्हणाले, की केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर जेव्हा जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येत होती. काही दिवसांवर अमरनाथ यात्रा आली असताना यात्रेच्या जागेपासून काही अंतरावरच हा हल्ला घडवून अतिरेक्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण भारतीय सैन्य या अतिरेक्यांना नक्की धडा शिकवेल, गरज पडेल तेव्हा देशभरातून हजारो हिंदू तरुण देशाच्या रक्षणासाठी, जिहादी मानसिकता संपवण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये दाखल होतील, असे संगपाळ यांनी सांगितले. सभेच्या वेळी बजरंग दल ठाणे विभाग संयोजक अमरजीत सुर्वे, संजीव रावत, शुभम शिंदे, ओमकार कदम, सिद्धार्थ खैरनार, अक्षय चोरघे, अतुल शेळके, स्वप्नील आरोटे, राम खोपडे, राजू राजपुरोहित, आदर्श बिरादार अन्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
..........
पहलगाम हल्ल्याचा पनवेल शिवसेनेतर्फे निषेध
पनवेल, ता. २४ (बातमीदार) ः जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे धर्म विचारून निर्दोष नागरिकांची गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेचा पनवेल शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी काढलेल्या मोर्चात निषेध करण्यात आला. तसेच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हल्ल्यात जखमी झालेल्या भारताच्या कानाकोपऱ्यातील सर्व नागरिकांचे आरोग्य लवकरात लवकर सुधारावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
अतिरेकी हल्ल्याचा निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हत्याकांडातील दोषींचा त्वरित शोध घेऊन कठोर कारवाई करावी, काश्मीरमधील निर्दोष नागरिकांच्या सुरक्षेची आणि संरक्षणाची व्यवस्था अधिक मजबूत करावी, केंद्र सरकारने या घटनेचा गांभीर्याने दखल घेऊन प्रभावी उपाययोजना करावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना पायबंद घालता येईल व समाजात द्वेष आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कट्टरपंथी विचारांचा समूळ नायनाट करण्यासाठी कठोर पावले उचलण्यात यावीत, अशी मागणी रामदास शेवाळे यांनी या वेळी केली. सभेला कामोठे शहरप्रमुख सुनील गोवारी, कळंबोली शहरप्रमुख तुकारामशेठ सरक, खारघर शहरप्रमुख प्रसाद परब व इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.