उरणमध्ये सेवारोडवर अवैध पार्किंग
esakal April 25, 2025 03:45 AM

उरणमध्ये सेवा रस्त्यावर अवैध पार्किंग
अपघाताचा धोका; वाहतुकीला अडथळा
उरण, ता. २४ (वार्ताहर) ः जेएनपीए बंदराची वाहतूक सुरळीत होण्याच्या अनुषंगाने एनएचएआय आणि जेएनपीएच्या माध्यमातून सहा लेनचा हायवे बांधण्यात आला आहे. या हायवेला सेवा रस्ता देण्यात आला आहे; मात्र सेवा रस्त्याचा ताबा अवजड वाहतुकीने घेतल्याने वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
जेएनपीए बंदराची निर्मिती झाल्यावर या विभागात काही प्रमाणात उद्योगधंदे सुरू झाल्याने भूमिपुत्रांना रोजगार मिळाला. गावांच्या अवतीभोवती जेएनपीए बंदरातील माल साठविण्याची अनेक गोदामे सुरू झाली. पर्यायाने या विभागात अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली. शिवाय, विमानतळ, अटल सेतू आदी मोठे प्रकल्प उरणमध्ये आल्याने येथील दळणवळण सुधारण्यासाठी मोठमोठे हायवे बांधण्यात आले आहेत. जेएनपीए आणि एनएचएआयने पळस्पे ते जेएनपीए- गव्हाण फाटा असे रस्त्याचे जाळे विणले आहे. अनेक उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. शिवाय, हलक्या वाहनांसाठी सेवा रस्ते तयार करण्यात आले आहेत; मात्र सेवा मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून अनेक अवजड वाहनांची अवैध पार्किंग सुरू आहे. यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे या वाहनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
..................
उरण तालुक्यातील जासई उड्डाणपुलाखाली द्रोणागिरी नोड, खोपटे- कोप्रोली रस्ता, दिघोडे- गव्हाण फाटा रस्त्यावर अनेक अवजड ट्रेलर नेहमी बेकायदा उभे असतात. त्यामुळे विद्यार्थी, नोकरवर्ग यांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या सेवा रस्त्यांकरिता न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. सेवा रस्ते हे येथील नागरिकांसाठी तयार केलेले आहेत. येथील अवजड वाहतूक ही ७६ लाखांच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे हे सेवा रस्ते खुले केले नाहीतर मोठी वाहतूक कोंडी होऊन जनजीवन विस्कळित होईल, असे उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी सांगितले.
..................
पोलिस प्रशासनाकडून अवजड वाहनांवर नेहमीच कारवाई करण्यात येते; मात्र चालकांकडून पुन्हा वाहने रस्त्यावर पार्क केली जात आहेत. यासाठी खास पार्किंगसाठी सहा ठिकाणच्या जागेसाठी सिडकोकडे प्रस्ताव पाठविला आहे. लवकरच सिडकोकडून त्याची पूर्तता होईल.
- अतुल दहिफळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उरण

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.