नेवराच्या केशरी लाल फुलांचा सडा
विरार, ता. २४ (बातमीदार) : सध्या जिकडे तिकडे वसंतोत्सव सुरू आहे. वेगवेगळ्या झाडांवरील मोहक फुले साऱ्यांचे लक्ष आकर्षित करीत आहेत. सध्या असेच एक नेवराचे झाड आणि त्यावरील फुले वसईच्या मूळगाव परिसरात दिसून येत आहे. या झाडाभोवती सकाळी पडलेल्या फुलांचा सडा लक्ष वेधून घेत आहे. मूळगावातले ते नेवराचे झाड अनेक वर्षांपासून आपल्या सावलीत सर्वांना सामावून घेत आहे. कधी उन्हातून निवारा देते, कधी पावसात ओलसर पानांमधून सरी झेलते, पण सर्वात खास क्षण येतो पहाटेच्या वेळी, जेव्हा त्याच्या लोंबकळणाऱ्या फुलांमधून हळूहळू एक सुंदर, केशरी-लाल सडा झाडाखाली पसरत असतो. पडलेल्या फुलांच्या सड्यावर लहान मुले खेळतात आणि आनंदित होतात.