मालवाहतूक ट्रकची झाडाला धडक
esakal April 25, 2025 03:45 AM

मालवाहतूक ट्रकची झाडाला धडक
चालक गंभीर जखमी
कासा, ता. २४ (बातमीदार) : डहाणू-नाशिक राज्य महामार्गावरील गंजाडजवळ गुरुवारी (ता. २४) दुपारी बारा वाजता दगड वाहून नेणारा मालवाहतूक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाडावर आदळला. या भीषण अपघातात ट्रकच्या केबिनचे नुकसान झाले आहे. तसेच चालकही गंभीर जखमी झाला आहे.

अपघातानंतर ट्रकमधील दगड रस्त्यावर विखुरले गेले होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली. ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी चार ते पाच जेसीबी यंत्रांची मदत घेण्यात आली. तब्बल तासभराच्या प्रयत्नांनंतर चालकाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तातडीने डहाणू उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

अपघातग्रस्त चालकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्रावही झाला आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मुंबई-वडोदरा एक्सप्रेस महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर दगड व माती वाहून नेणारे ट्रक या मार्गावर सतत वाहतूक होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिकांनी संबंधित यंत्रणांना योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे. अपघातानंतर काही काळ डहाणू-नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती; मात्र डहाणू पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत वाहतूक सुरळीत केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.