Pahalgam Terror Attack : बदला घ्या..! पुन्हा घुसून मारा
esakal April 25, 2025 05:45 AM

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यामुळे अवघा देश शोकसंतप्त झाला आहे. पाकिस्तान पुरस्कृत हा दहशतवाद आता ठेचून काढा, पुन्हा घुसून मारा; अशी मागणी सर्वस्तरांतून होते आहे. काश्मीर खोऱ्याप्रमाणेच आज देशभर विविध ठिकाणांवर निषेध मोर्चे, कँडल मार्च काढून या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी या हल्ल्याला ‘करारा जवाब’ मिळेल असे सांगत हा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही असे म्हटले आहे. या हल्ल्याच्या पडद्यामागचे सूत्रधार शोधून काढू असेही त्यांनी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय समुदायानेही या हल्ल्याचा निषेध करताना दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडे संशयाची सुई वळली असून नेहमीप्रमाणे पाकच्या प्रशासनाने आमचा या हल्ल्याशी संबंध नसल्याचे सांगत हात झटकले आहेत. हा हल्ला करणाऱ्या तीन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी करण्यात आली असून बैसरन खोऱ्यामध्ये सुरक्षा आणि तपास यंत्रणा त्यांचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान समाजमाध्यमांत व्हायरल झालेल्या या दहशतवाद्यांच्या रेखाचित्राला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. राष्ट्रीय तपास संस्थाही (एनआयए) आज तपास कार्यामध्ये सहभागी झाली . दिल्लीमध्येही बैठकांना वेग आला असून केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी वरिष्ठ तपास यंत्रणांकडून आढावा घेतला. जम्मू- काश्मीरमध्ये गेलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सकाळी अनंतनाग येथील पोलिस नियंत्रण कक्षामध्ये ठेवण्यात आलेल्या मृतांच्या पार्थिवांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ते ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या बैसरन खोऱ्याच्या दिशेने रवाना झाले. येथे त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तत्पूर्वी त्यांनी मृतांच्या नातेवाइकांशी संवाद साधला.\

पंतप्रधानांनी घेतला आढावा

दहशतवादी हल्ल्याचे वृत्त समजताच सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहाटेच दिल्ली विमानतळावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची बैठक घेतली. या बैठकीला परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये नेमकी कोणत्या मुद्यावर चर्चा झाली याचा तपशील मात्र उघड झालेला नाही.

सैफुल्ला सूत्रधार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यामध्ये दोन स्थानिक आणि दोन परकी दहशतवाद्यांचा हात होता. सैफुल्ला खालिद हा या हल्ल्याचा सूत्रधार असल्याची माहिती देण्यात आली. तो पाकव्याप्त काश्मीरमधून सारी सूत्रे हालवितो. सध्या तो रावलकोट येथे असल्याचे बोलले जाते. सैफुल्लाने एक महिना आधीच इशारा दिला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.