आयपीएल स्पर्धेतून भारतीय संघाला नव्या खेळाडूंची फळी तयार करण्यास मदत होते. यंदाच्या पर्वात 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची कामगिरी पाहून त्याला राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात घेतलं. 30 लाखांची बेस प्राईस असताना बोली लावली. तसेच 1.10 कोटी रुपये खर्च करून संघात घेतलं. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण कोट्यधीश बनला. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची खेळी पाहून भविष्यात त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. आयपीएल स्पर्धेत वैभव सूर्यवंशीला लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली. त्याने पहिल्या डावात 34 धावा केल्या. यावेळी त्याने आवेश खानच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. पण त्याचा फॉर्म आणि शैली पाहून वीरेंद्र सेहवागने त्याचे कान टोचले आहेत. चांगल्या सुरुवातीने वाहत जाऊ नको आणि भविष्यावर लक्ष केंद्रित कर, अशा पद्धतीने इशारा दिला.
वीरेंद्र सेहवागने क्रिकबझशी केलेल्या चर्चेत म्हणाला, “अनेक खेळाडूंना एक किंवा दोन चांगले डाव खेळताच आपण स्टार झाल्यासारखे वाटते. पण स्थिरावत नाहीत. जेव्हा ते चांगले खेळतात तेव्हा त्यांची प्रशंसा होते, परंतु जेव्हा ते चांगले खेळत नाहीत तेव्हा त्यांच्यावर टीका होते. हे सर्व समजण्यासारखे आहे आणि कोणत्याही खेळाडूने आपला संयम गमावू नये.” वैभवला 20 वर्षे आयपीएलमध्ये खेळण्याचे ध्येय ठेवून पुढे जाण्याचा सल्ला देण्यात आला. वैभवला टीम इंडियात इतक्या लवकर स्थान मिळणं कठीण आहे. त्यामुळे त्याला देशांतर्गत क्रिकेट आणि फिटनेसवर काम करावं लागणार आहे.
विराट कोहलीचे उदाहरण देत सेहवाग म्हणाला की, “विराटने वयाच्या 19व्या वर्षी आयपीएल खेळायला सुरुवात केली. आता तो आयपीएलच्या 18व्या पर्वात खेळत आहे. सूर्यवंशीनेही त्याच प्रकारे लक्ष केंद्रित केले पाहिजे. पण जर तो पदार्पणाच्या खेळीवर समाधानी असेल तर तो पुढच्या वर्षी पुन्हा दिसणार नाही.” रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात वैभवने 12 चेंडूत 16 धावा केल्या पण तो विजय मिळवू शकला नाही. राजस्थानने हा सामना 11 धावांनी गमावला.