Parenting Tips : ओव्हर पेरेंटिंग ठरू शकते धोकादायक
Marathi April 25, 2025 11:25 PM

मुले ओल्या मातीसारखी असतात, आपण त्यांना जसा आकार देऊ तसाच आकार ते घेत असतात. पण आजच्या काळात असे दिसून येते की मुलांची प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी पालक त्यांचे अति लाड पुरवतात. आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात, ज्यामुळे कधीकधी मुलांचे नुकसान होऊ शकते. या अति लाडालाच ‘ओव्हर पेरेंटिंग’ असे म्हणतात. त्यामुळेच अशा परिस्थितीत, जाणून घेऊयात अशी काही लक्षणे जी मुलामध्ये दिसल्यास तुम्ही सावध असले पाहिजे कारण तुमच्या अति लाडामुळे मूल बिघडण्याच्या मार्गावर जाऊ शकते.

अति लाड करण्याची लक्षणे

मुलांचे लाड करणे आणि त्यांचे हट्ट पुरवणे हे अर्थात महत्वाचे आहे, परंतु अति लाड केल्याने मुले बिघडू शकतात. कारण अशा परिस्थितीत, मुलांनी काही चुकीचे केले तरी ते त्यांच्या मुलांना फटकारत नाहीत. त्यामुळेच मुले हेकेखोर स्वभावाची बनतात आणि त्यांच्या पालकांनाच उलट उत्तरे देऊ लागतात. किंवा ब्लॅकमेलही करतात. आणि त्यांचे म्हणणे पटवून देण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. याकरताच मुलांचे अति लाड करणे वेळीच थांबवले पाहिजे.

प्रत्येक गोष्टीसाठी आग्रह धरणे

जर तुमचे मूल प्रत्येक लहान सहान गोष्टीकरता आग्रह धरत असेल, रडत असेल आणि तुम्हाला शेवटी त्याच्या मागणीला बळी पडावे लागले असेल, तर ते तुम्हाला भावनिकरित्या ब्लॅकमेल करून तुमच्याकडून काही मिळवू इच्छित असल्याचे हे लक्षण आहे आणि तो बिघडत चालला आहे.

नाही ऐकण्याची सवय नसणे

जर तुम्ही तुमच्या मुलाला एखादी वस्तू देण्यास नकार दिला आणि ते ऐकून मूल रागावले किंवा आरडाओरड करत असेल तर समजून घ्या की तुम्ही त्याचे जास्त लाड करत आहात कारण त्याला नेहमीच त्याच्या आवडीच्या गोष्टी दिल्या जात आहेत. आणि जेव्हा मुलाला हव्या असलेल्या गोष्टी मिळत नाहीत तेव्हा तो रागावतो.

स्वतः कोणतेही काम न करणे

जर तुमचे मूल छोट्या छोट्या गोष्टींसाठीही तुमच्यावर किंवा इतरांवर अवलंबून असेल. जसे खेळणी उचलणे, बूट घालणे, स्वत:च्या हाताने न जेवणे याचा अर्थ असा की तुम्ही त्याचे गरजेपेक्षा जास्त लाड करत आहात.

पराभव स्विकारत नाहीत

स्पर्धा हरल्यानंतर तुमचे मूल देखील रडते का आणि त्याला केवळ जिंकायचे असते का? जर तो एखाद्या स्पर्धेत हरला आणि रागावला किंवा खेळणे थांबवले तर तुमचे मूल चिडके व हेकेखोर स्वभावाचे आहे आणि त्याला पराभव कसा स्विकारायचा हे माहित नाही.

लक्ष वेधण्याची सवय

अति लाड करणारी मुले नेहमीच इतरांचे लक्ष वेधून घेतात. जर तुमचे लक्ष दुसऱ्या मुलाकडे किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडे गेले तर ते तुमच्यावर चिडचिड करतात किंवा नाराज होतात.

स्वतःची चूक न स्विकारणे

जर मुल त्याच्या चुका स्विकारण्याऐवजी सबबी सांगत असेल किंवा इतरांना दोष देत असेल. तर हे जास्त लाड केल्यामुळे देखील असू शकते, कारण तुम्ही त्याला त्याच्या चुका स्विकारायला शिकवलेले नाही.

अति लाड कसे टाळावे ?

तुमच्या मुलाला नाही म्हणण्याची सवय लावा. प्रत्येक मागणी पूर्ण करू नका, त्यांना छोट्या जबाबदाऱ्या द्या आणि त्यांना स्वतःचे काम स्वतः करण्याची सवय लावा. शिस्त शिकवा, सर्वांशी चांगले वागण्यास प्रेरित करा, चुकांमधून शिकायला शिकवा आणि घडलेल्या गोष्टी इतरांशी शेअर करायला शिकवा.

हेही वाचा : Hair Care Tips : हेयर मास्क आणि कंडीशनरपैकी काय उत्तम ?


संपादित – तनवी गुडे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.