आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी निराशाजनक आहे. आतापर्यंत खेळलेल्या नऊ पैकी सात सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यामुळे प्लेऑफचं गणित चुकलं आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पराभव होताच उर्वरित आशाही मावळल्या आहेत. महेंद्रसिंह धोनीकडे संघाचं नेतृत्व आहे. मात्र असं असूनही संघाची कामगिरी काही सुधारली नाही. उलट पराभवाची मालिका सुरूच राहिली. असं असताना सलामीवीर वीरेंद्र सेहवागने या पर्वात चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी पाहून खडे बोल सुनावले आहेत. चेन्नईच्या फलंदाजांना चिमटा काढला आहे. इतके अनुभवी असूनही या पर्वात सीएसकेचे फलंदाज खूपच खराब खेळले, असंही वीरेंद्र सेहवाग म्हणाला.
या पर्वात चेन्नई सुपर किंग्सने रवींद्र जडेजावर विश्वास ठेवत 18 कोटी मोजून संघात कायम ठेवलं. मात्र त्याच्याकडूनही अपेक्षाभंग झाला. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाची कामगिरी या पर्वात खूपच निराशाजनक राहिली. नऊ सामन्यांमधील नऊ डावांमध्ये 27.66 च्या सरासरीने फक्त 166 धावा केल्या आहेत. यात फक्त एका अर्धशतकाचा समावेश आहे. तर त्याचा स्ट्राईक रेट फक्त 125.75 आहे. तसा पाहिला तर हा स्ट्राईक रेट काही टी20 हिशेबाने चांगला नाही. वीरेंद्र सेहवाग म्हणाली की, ‘सनरायझर्स हैदराबादविरुद्ध परिस्थिती फलंदाजीसाठी अवघड असताना जडेजान एका बाजूने सावधपणे खेळायला हवं होतं.’
सेहवाग चेन्नईच्या फलंदाजांना टोमणे मारत म्हणाला की, “मी असं म्हणत नव्हतो का की मला स्पर्धेच्या मध्यात घरी जावंसं वाटतंय? चेन्नईचे फलंदाज कदाचित हेच विचार करत असतील. त्यांचे फलंदाज कधी घरी परततील याचा विचार करत आहेत.” सेहवाग म्हणाला की, चेन्नईच्या किमान एका फलंदाजाने तरी ही जबाबदारी घ्यायला हवी होती. त्याने किमान 15 व्या किंवा 18 व्या षटकापर्यंत तरी थांबण्याचा प्रयत्न करायला हवा होता.
सॅम करन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी का आला ते कळत नाही, असंही सेहवाग म्हणाला. ‘सॅम करनच्या जागी ब्रेविस फलंदाजीला येऊ शकला असता. त्यानंतर शिवम दुबेला पाठवायला पाहीजे होतं. मग जडेजा, सॅम करन आणि दीपक हुड्डा फलंदाजीला येऊ शकले असते.’ इतकंच काय तर संघाला ऋतुराज गायकवाडची उणीव भासत असल्याचं देखील सांगितलं.