भिवंडी, ता.२६ (वार्ताहर)ः दुचाकीवर बसलेल्या युवकाच्या हातावर फटका मारल्याने मोबाईल फुटल्याच्या रागातून चाकू हल्ला करणाऱ्याला शांतीनगर पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे. मेराज ऊर्फ पिंकी मेहमुद शाह असे अटक आरोपीचे नाव आहे.
अख्तर हुसैन अन्सारी हा घरासमोर पार्क केलेल्या दुचाकीवर बसुन मोबाईल बघत होता. याचवेळी आरोपी मेराज ऊर्फ पिंकी मेहमुद शाह याने अख्तर याच्या हातावर फटका मारला. यामध्ये हातातील मोबाईल खाली पडून फुटला. त्याचा जाब विचारल्याने आरोपी मेराजने जवळील चाकूचा धाक दाखवून अख्तरला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. त्याचे मित्र मोहम्मद कैफ दिलनवाज शेख, इरफान अन्सारी यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण मेराजने हातातील चाकूने इरफान अन्सारीवर वार केले. यावेळी झालेल्या झटापटीत मोहम्मद कैफ शेखसोबत अख्तरच्या आईला देखील दुखापत झाली होती.
-------------------------------------------------
दोन दिवसांची पोलिस कोठडी
आरोपी उत्तरप्रदेश येथे पळून जाण्यासाठी मुंबईला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे मुंबई रेल्वे पोलिसांच्या मदतीने आरोपी मेराज ऊर्फ पिंकी मेहमुद शाहला अटक केली. भिवंडी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.