इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शनिवारी (२६ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात ४४ वा सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्सच्या सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी अफलातून फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधल. त्यामुळे पंजाबने २०० धावांचा टप्पा पार करत कोलकातासमोर २०२ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
यंदाच्या हंगामात पंजाब किंग्स संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पंजाबने ८ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत आणि ३ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे यंदा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आणि मुख्य प्रशिक्षक मार्गदर्शनात खेळणाऱ्या पंजाबला विजेतेपदाचा प्रबळ दावेदारही म्हटले जात आहे.
गेल्या १७ वर्षात एकदाही विजेतेपद जिंकलेले नाही. त्यामुळे अद्याप तरी त्यांना पहिल्या वितेपदाची प्रतिक्षा आहे. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने म्हटले आहे की पंजाब यंदा जिंकूच शकत नाही. याला कारण रिकी पाँटिंगची रणनीती असल्याचे त्याने म्हटले आहे.
झाले असे की शनिवारी होत असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सकडून प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या सलामीवीरांनी दमदार फलंदाजी करत सलामीसाठी १२० धावांची भागीदारी केली. या दोघांनी अर्धशतकेही केली. १२ व्या षटकात प्रयांश आर्य ३५ चेंडूत ६९ धावा करून बाद झाला. त्याने ८ चौकार आणि ६ षटकार मारले.
तो बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर फलंदाजीला उतरला. नंतर १५ व्या षटकात प्रभसिमरन सिंगही ४९ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह ८३ धावांवर बाद झाला. तो बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीला आला, पण तो ८ चेंडूत ७ धावा करून बादही झाला. त्यानंतर मार्को यान्सिन फलंदाजीला आला, पण तोही ३ धावांवर बाद झाला. नंतर जोस इंग्लिस फलंदाजीला आला.
२० षटके संपली, तेव्हा पंजाबने ४ बाद २०१ धावा केल्या होत्या. श्रेयस अय्यर २५ धावांवर आणि इंग्लिस ११ धावांवर नाबाद राहिला. मात्र मधल्या फळीत नेहल वढेरा आणि शशांक सिंग या भारतीय खेळाडूंना फलंदाजीला न पाठवल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. यात मनोज तिवारीचाही समावेश आहे, याच कारणामुळे त्याने म्हटले की पंजाब यंदा विजेतेपद जिंकू शकत नाही.
मनोज तिवारीने ट्वीट केले की 'मला माझं मन सांगतंय की पंजाब किंग्स आयपीएल ट्रॉफी या हंगामात जिंकू शकणार नाही. कारण जे मी आज पाहिजे, ते जेव्हा फलंदाजी करत होते, तेव्हा प्रशिक्षकांनी नेहल वढेरा आणि शशांक सिंग या फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय फलंदाजांना फलंदाजीसाठी पाठवले नाही. त्याऐवजी त्याने परदेशी खेळाडूंवर विश्वास दाखवला, पण ते कामगिरी करू शकले नाहीत.
'तसेच यातून स्पष्ट दिसले की त्यांचा भारतीय फलंदाजांवर विश्वास नाही. जर यापुढेही तसेच चालू राहिले, तर ते पहिल्या दोन क्रमांकावर जरी राहिले, तरी त्यांच्यापासून विजेतेपद लांबच राहिल.'
दरम्यान, शनिवारी झालेला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात पंजाबने दिलेल्या २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कोलकाता संघाने पहिल्या षटकात बिनबाद ७ धावा केल्या असतानाच पावसाला सुरुवात झाली.
पाऊस बराच काळ थांबला नाही, त्यामुळे अखेर हा सामना रद्द झाला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळाला.