इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात ४४ वा सामना खेळवला गेला. या सामन्यातील पहिल्या डावाचा खेळही पूर्ण झाला होता. पण दुसऱ्या डावाची सुरुवात झाली असतानाच पावसाला सुरुवात झाली.
बराचवेळ पाऊस झाला. त्यामुळे अखेर रात्री ११ वाजताच्या सुमारास हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण देण्यात आला आहे. यामुळे पाँइंट्स टेबलमध्येही बदल झाले आहेत.
ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पंजाबने पूर्ण २० षटके फलंदाजी करताना कोलकातासमोर २०२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
पण या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच षटकानंतर पावसाचा अडथळा आला. कोलकातामध्ये बराचवेळ पाऊस पडला.
या सामन्यात पंजाबकडून सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी दमदार फलंदाजी करताना अर्धशतके साकारली. याशिवाय त्यांना १२० धावांची सलामी भागीदारीही केली. हे दोघेही सुरुवातीपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.
प्रियांश आर्यने ३५ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ६९ धावांची खेळी केली. तसेच प्रभसिमरनने ४९ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह ८३ धावांची खेळी केली.
हे दोघे बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि मार्को यान्सिन हे स्वस्तात बाद झाले. मॅक्सवेल ७ धावांवर आणि यान्सिन ३ धावांवर बाद झाले. पण नंतर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि जोश इंग्लिसने संघाला २०० धावांपर्यंत पोहचवले. श्रेयसने १६ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या, तर इंग्लिसने नाबाद ११ धावा केल्या.
कोलकाताकडून वैभव अरोराने २ विकेट्स घेतल्या, तसेच वरूण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
त्यानंतर कोलकाता संघाकडून रेहमनुल्ला गुरबाज आणि सुनील नरेन हे सलामीला उतरले होते. पंजाबकडून मार्को यान्सिनने गोलंदाजीची सुरुवात केली. पण १ षटकात ७ धावा झाल्या. त्यानंतर पावसामुळे सामना थांबला.
पाँइंट्ल टेबलमध्ये बदलकोलकाता - पंजाब सामना रद्द झाल्याने मुंबई इंडियन्स ५ क्रमांकावर घसरले आहेत. कारण पंजाब किंग्सचे आता ९ सामन्यांत ११ गुण झाले असल्याने ते आता चौथ्य क्रमांकावर आहेत. १० गुणांवर असलेला मुंबई इंडियन्स संघ चौथ्या स्थानावरून पाचव्यावर घसरले आहेत.
पाँइंट्स टेबलमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तिन्ही संघांचे १२ गुण आहेत. पण नेट रन रेटमुळे स्थान निश्चित होत आहे. तसेच लखनौ सुपर जायंट्सचेही १० गुण आहेत. पण त्यांचा नेट रन रेट मुंबईपेक्षा कमी असल्याने ते सहाव्या क्रमांकावर आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सलाही १ गुण मिळाल्याने त्यांचे ७ गुण झाले असून ते सातव्या क्रमांकावर आहेत. ६ गुणांसह सनरायझर्स हैदराबाद ८ व्या क्रमांकावर आहेत. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन संघ ४ गुणांसह तळातील अनुक्रमे ९ व्या आणि १० व्या स्थानावर आहेत.