मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेली धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस हेच २०३४ पर्यंत मुख्यमंत्री राहतील असा दावा केल्यानंतर २०८० पर्यंत त्यांनाच मुख्यमंत्री राहू द्या, असा टोला शिवसेनेने लगावला.
बावनकुळे यांनी एका कार्यक्रमादरम्यान ‘देवेंद्र फडणवीस हे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आहेत. त्यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. ते २०३४ पर्यंत मुख्यमंत्रिपदी कायम राहतील. त्यांच्याशिवाय विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही,’ असा दावा केला. त्यांच्या या दाव्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता त्यांनी त्यावर बोलणे टाळले. त्यांनी केवळ शुभेच्छा म्हणत हात जोडले.
सारवासारवही
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मात्र ‘२०३४ कशाला २०८० पर्यंत त्यांना मुख्यमंत्री राहू द्या,’ असा टोला लगावला. २०८० पर्यंत मुख्यमंत्री झाले तरी आमची काय हरकत आहे. बावनकुळे, फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनाही शुभेच्छा. कुणी आमच्यात आग लावण्याचा प्रयत्न केला तरी आमच्या मतभेद होणार नाहीत, असे म्हणत त्यांनी आपली बाजू सावरली.