>> चंद्रसेन टिळेकर
ज्या पौर्वात्य आणि पाश्चात्य राष्ट्रांनी स्त्राrची कार्यक्षमता ओळखून तिच्यावर जबाबदारी टाकली आहे ती राष्ट्रे उत्तम स्थितीत तर आहेतच, पण तिथे इतर राष्ट्रांच्या तुलनेत भ्रष्टाचारही खूप कमी झाला आहे. आपल्या समाजाने मात्र एकतर स्त्रीला देवीच्या देव्हाऱयात तरी बसवले किंवा चूलमूल हेच तिचे क्षेत्र ठरवून टाकले होते. पण आता हळूहळू का होईना विचारात परिवर्तन होत आहे हे मान्यच करावे लागेल.
स्वेच्छानिवृत्ती घेऊन नित्याने गावी म्हणजे देहूला जाणे क्रमप्राप्त झाले होते, कारण तिथे थोडीफार शेती होती तिच्याकडे लक्ष देणे आवश्यक होऊन बसले होते. असाच एकदा मी माझ्या शेताच्या बांधावर बसलो होतो. महाराष्ट्र विद्युत बोर्ड नित्यनियमाने वीज गायब करण्यात वाक्बगार असल्याने काही काम नसल्याने विपश्यनेला बसल्यासारखे बांधावर काही काम न करता निष्काम बसलो होतो. बोलीभाषेत सांगायचे तर माशा मारीत बसलो होतो. दिवस आखाडय़ाचे म्हणजे आषाढाचे होते. बालकवींनी म्हटल्याप्रमाणे, ‘क्षणात येते सरसर शिरवे क्षणात ऊन पडे’ याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. सहज थोडे दूरवर लक्ष गेले तेव्हा एक जोडपे बहुधा नवपरिणीतच असावे, कारण त्यातली ‘ती’ अधून मधून आपल्या जोडीदाराकडे सस्मित नजरेने अन् काहीशी लाजून पाहात होती.(कालांतराने लग्न थोडे मुरले की त्याचे विरजण झाल्यावर अशी नजाकत सहसा पाहायला मिळत नाही. म्हणून तसा कयास केला एवढेच.) तसे छानपैकी ऊन पडले होते. पण निसर्गाला बालकवींची आठवण झाली असावी तसे त्याने ‘सर सर शिरवे’ पाडायला सुरुवात केली. त्या जोडप्यावरही ते शिरवे बरसू लागताच तिने आपला जीवनसाथी भिजू नये म्हणून लगबगीने आपला पदर त्याच्या डोक्यावर धरला. मी काहीसे भान हरपूनच ते दृश्य पाहात होतो. त्या दृश्याला मोहक म्हणावे, मनोहर म्हणावे की रमणीय म्हणावे ते मला सुचेना! पण काहीही म्हणा, असे काही भावनिक दृश्य पाहिले की आचार्य अत्रे यांच्या नाटकातील एका सुभाषित वजा वचनाची आठवण येते आणि ते म्हणजे, ‘स्त्राr ही क्षणाची पत्नी आहे, पण अनंत काळची माता आहे!’
खरे तर दोघांच्याही अंगावर त्या सरी कोसळत होत्या आणि दोघेही भिजत होते. पण आपला जोडीदार भिजू नये म्हणून तिने जी तत्परता दाखवली ती त्याने मात्र दाखवली नाही. मनात विचार करीत होतो, निसर्गाने तिच्या मनात ममता ठेवण्याची तत्परता बाळगली तशी ममता, सहृदयता त्याच्या मनात का बरे ठेवली नव्हती? विशेष म्हणजे ‘पुरुषाच्या कल्याणा, स्त्रियांच्या विभूती’ हे तरी पुरुषांना कधी जाणवले की नाही? तिचे जे काही एकतर्फी योगदान असेल किंवा आहे ते त्याच्या खिजगणतीत तरी आहे का? का तिचे एकूणच बलिदान ज्याला इंग्रजीत Taken for granted म्हणतात तसे काही आहे? खरे सांगायचे तर याचे उत्तर सरळ सरळ नाही असेच आहे.
पण कधी कधी असे वाटते की, ही परिस्थिती स्त्राrनेच स्वतवर ओढवून घेतली नाही काय? जगभरच्या धर्मग्रंथांनी स्त्राrला पुरुषाच्या तुलनेत दुय्यमच स्थान दिले आहे. तरीही पुरुषांपेक्षा स्त्रियाच एकूणच धार्मिकतेच्या आहारी गेलेल्या दिसतात की नाही? सर्व प्रकारच्या पूजाअर्चा, कालबाह्य कर्मकांडे करण्याचा अट्टहास कोणाचा असतो? अंधश्रद्धेच्या बळी सगळ्यात जास्त स्त्रियाच असतात. पण तरीही किती स्त्रिया, अगदी शिक्षित, उच्चशिक्षित अंधश्रद्धेला तिलांजली देताना दिसतात? विधवा, वांझ स्त्रियांच्या बाबतीत इतर श्रेय किती सहृदय असतात? वांझ स्त्राrच्या मांडीवर मूल द्यायला अजून सुशिक्षित स्त्राrही कचरते की नाही? मग अशा वेळी स्त्राrच स्त्राrची शत्रू असते असे पुरुष वर्ग म्हणाला तर त्याचा प्रतिवाद कसा करायचा?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दुय्यमतेमुळे स्त्राrच्या दयनीय अवस्थेला मनुस्मृति किंवा गुरुचरित्रात सांगितलेला उपदेश जबाबदार आहे, असे म्हणता येणार नाही. कारण आज जो पुढारलेला पाश्चात्य समाज आहे त्यांच्या ग्रंथात कुठे स्त्रियांच्या बाबतीत काही अपमानास्पद विषमतापूर्वक असे काही लिहिले आहे? तरीही तिथे काल-परवापर्यंत स्त्राr-पुरुष समानता नव्हती. एवढेच काय, पण तिला साधा पुरुषांप्रमाणे मतदानाचा हक्कही नव्हता. हा हक्क मिळायला तिथे 19 व्या शतकाच्या अंतापर्यंत स्त्राrला वाट पाहावी लागली आणि तेही तिथल्या स्त्रियांनी प्रचंड मोठा लढा दिल्यानंतर, निरंतर संघर्ष केल्यानंतर.
मग निदान त्या बाबतीत तरी भारतीय स्त्राr नशिबवान समजली पाहिजे, कारण त्यासाठी तिला कोणताही संघर्ष करावा लागला नाही. देश स्वतंत्र होताच तिला तो अधिकार विनासायास मिळाला. अर्थात ती पुण्याई म्हणा, कृपा म्हणा अथवा योगदान म्हणा, ते सर्व महान प्रज्ञावंत भारतरत्न संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. कदाचित त्यांनी ज्यांना गुरू मानले होते त्या महात्मा जोतिराव फुले त्यांची एक धारणा नक्कीच त्यांच्या वाचनात आली असावी ती म्हणजे ‘स्त्राr जातीचे महान उपकार पुरुष जातीवर झालेले आहेत!’ त्रिखंडात आपल्या विद्वत्तेने गाजलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामानाने कमी विद्याप्रविण असलेल्या महात्मा फुले यांना आपले गुरू मानावे हे काहीसे चकित करण्यासारखे असले तरी यथोचितच आहे. यात दुमत नसावे.
स्त्रियांच्या संदर्भात आजवर जो सवतासुभा झाला त्याला आधीच्या स्त्राrप्रधान संस्कृतीनंतर पुढे आलेली पुरुषप्रधान संस्कृतीही नक्कीच कारणीभूत आहे. हा खांदेपालट का झाला हाही एक महत्त्वाचा विषय आहे. स्त्राी प्रधान संस्कृतीत स्त्राr ही केवळ सुखीच नाही तर पुरुषांपेक्षा अधिक कार्यक्षम आहे असे दिसून आले होते. निसर्गतच स्त्राrला पुरुषापेक्षा अधिक अवधान असते हे कबूल करावेच लागते. ज्या पौर्वात्य आणि पाश्चात्य राष्ट्रांनी स्त्राrची ही कार्यक्षमता ओळखून तिच्यावर जबाबदारी टाकली आहे ती राष्ट्रे उत्तम स्थितीत तर आहेतच, पण तिथे इतर राष्ट्रांच्या तुलनेत भ्रष्टाचारही खूप कमी झाला आहे. आपल्या समाजाने मात्र एकतर तिला देवीच्या देव्हाऱयात तरी बसवले किंवा चूलमूल हेच तिचे क्षेत्र ठरवून टाकले होते. पण आता हळूहळू का होईना विचारात परिवर्तन होत आहे हे मान्यच करावे लागेल.
लेखाच्या सुरुवातीला पावसात भिजणाऱया आपल्या जोडीदारावर पदर धरणाऱया स्त्राrबद्दल लिहिले आहे. तिचे ते कृत्य पाहून बांधावर बसून लिहिलेली कविता ‘तिचे हात’ ही इथे देण्याचा मोह आवरत नाही. मात्र जागेअभावी कविता पूर्ण देता येत नाही, तेव्हा फक्त शेवटच्या काही ओळी उद्रृत करतो त्या अशा…
मग मी ही माझ्या ‘हाताचा’ हिशेब मांडला
खूप बेरीज केली पण ‘हातचा’ नाही आला!
असं सगळं माझ्या आईने केलेले
तू असशील तिचे ‘हात’ उसने घेतलेले
एक सांगू, ते ‘हात’ उसनेच राहू दे
तुझ्या ‘हातात’, माझ्या आईचे ‘हात’ मला पाहू दे!
nc.tilekar@gmail.com
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी
चळवळीशी निगडित आहेत.)