मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस गेल्या कित्येक वर्षांपासून क्रिकेट वर्तुळात साजरा केला जातो. अगदी १६ वर्षी तो सनग्रेस मफतलाल या कंपनीत खास बाब म्हणून नियुक्त झाला तेव्हापासून २४ एप्रिलला वेगळेच महत्त्व प्राप्त झालेले आहे.
१९८८-८९चा तो काळ आणि आताचे आधुनिक युग कमालीचे बदलले तसे अशा महान व्यक्तींचे वाढदिवस साजरे करण्याचे प्रकारही बदलले... ‘सोशल’ झाले. हॅशटॅग वापरून सर्वसामान्यही शुभेच्छा देऊ लागले. कोणी कोणत्या आणि कशा शुभेच्छा दिल्या, हे समजू लागले.
२००९ मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून सचिनचा वाढदिवस आयपीएलमध्येच येत असतो. अगोदर तो खेळाडू म्हणून आणि त्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचा मेंटॉर म्हणून मैदानात असायचा; पण पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे सचिननेही वाढदिवस साजरा केला नाही; पण सोशल मीडियावर शुभेच्छांचा ओघ मात्र कायम होता.
जवळपास सर्वच आजी-माजी खेळाडूंनी सचिनला त्यांच्या त्यांच्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या; पण... माजी अष्टपैलू आणि समालोचक (यंदा आयपीएलमध्ये नसलेल्या) असलेल्या इरफान पठाणने सर्वांपेक्षा हटके अशी दिलेली शुभेच्छाची पोस्ट फारच चर्चेत राहिली.
एरवी असे आजी-माजी आणि सचिनसह खेळलेले सर्वच खेळाडू शुभेच्छा देताना स्वतःचे सचिनसोबतचे छायाचित्र पोस्ट करतात. इरफान पठाणच्या पोस्टमध्ये ना सचिनचे छायाचित्र होते ना त्याचे स्वतःचे... होता फक्त व्हॅगन व्हिल.
म्हणजेच २००४च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी कसोटीत अतिशय आवडता असा कव्हर ड्राइव्हचा एकही फटका न मारता सचिनने तब्बल नाबाद २४१ धावांची खेळी केली होती. त्या खेळीत सचिनने मैदानाच्या इतर भागात मारलेल्या ३३ चौकारांचा आलेख असलेले ते छायाचित्र आणि सोबत Wishing the GOAT a very happy birthday एवढाच संदेश त्याने लिहिला...
सचिनने इतक्या महान खेळी केलेल्या आहेत, त्याची असंख्य छायाचित्रे आहेत; पण इरफान पठाणने असे चित्र का निवडले? खोलवर विचार करता त्याचे कोडे ज्याला उलगडायचे त्याला उलगडले. इरफानने सचिनला शुभेच्छा देताना विराटवर तर निशाणा नाही साधला? अनेकांनी तर या शुभेच्छाच्या पोस्टखाली कमेंट करताना उघडपणे हे सत्य लिहिले आहे.
काहींना अजून या कोड्याचा उलगडा झाला नसावा... त्यासाठी थोडे पाठी जावे लागेल. इरफान हा स्पष्टवक्ता आहे. विशेष म्हणजे, यंदा सुरुवातीला कंटाळवाण्या ठरलेल्या आयपीएलमधील हिंदी समालोचनातील वायफळ बडबडीपेक्षा त्याचे विश्लेषण समर्पक असायचे.
कदाचित हाच स्पष्टपणा त्याला भोवला असावा. कारण मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध आणि ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकांमध्ये भारतीय संघाची झालेली दारुण हार यास फलंदाजांचे अपयश कारणीभूत होते. त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली अपेक्षाभंग करत होते.
न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात फिरकीसमोर अडखळणारा विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उजव्या यष्टीबाहेरील चेंडूवर वारंवार बाद होत होता. इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने तर विराटचा हा दोष केव्हाच उघड केला होता. यावर मार्ग काढण्यासाठी विराटने कधी सचिन तेंडुलकर, प्रवीण आमरे आणि संजय बांगर यांच्यासोबत सरावात घाम गाळला.
त्यात यशही मिळवले; परंतु अनेकदा संयम ढळायचा आणि विराट हिरमोड करून माघारी फिरायचा. इरफान पठाणने नेमके याच मुद्द्यावर ‘ऑन एअर’ थेट आणि परखड मत व्यक्त करून विराटवर टीका केली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्याहून परतल्यानंतर चॅम्पियन्स करंडक स्पर्धा झाली.
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने विजेतेपदही मिळवले आणि काही दिवसांनंतर आयपीएल सुरू झाली. हिंदी समालोचकांच्या यादीत अनुभवी इरफानचे नाव नसल्यामुळे सर्वांनीच भुवया उंचावल्या होत्या. त्याला वगळण्याचे कारण काय, असे विचार घोळत असताना इरफानने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराटवर केलेल्या त्या भाष्याचा व्हिडिओ अनेकांनी पोस्ट केला.
चॅम्पियन्स स्पर्धा सुरू असताना मास्टर लीग भारतात सुरू होती. त्यात सचिन तेंडुलकरच्या भारतीय संघातून इरफानही खेळत होता. त्यामुळे चॅम्पियन्स लीगच्या समालोचकांच्या यादीत इरफान नसणे स्वभाविक होते. परिणामी, ते कोडे उलगडले नव्हते. आयपीएलमध्ये समालोचनात आपण का नाही, याबाबत इरफानने भाष्य केले नाही.
स्वतःचा यूट्युब चॅनेल काढून तो त्यावर आता आपली मते मांडत आहे. आता अर्धी आयपीएल झाली आणि २४ तारखेला आलेल्या सचिनच्या वाढदिवसाला इरफानने हटके शुभेच्छाची पोस्ट सर्व संदर्भ स्पष्ट करणारी ठरली.
२००४ मध्ये सचिन कव्हर ड्राइव्हचा फटका मारताना बाद होत होता. खरे तर हा फटका सर्वात प्रेक्षणीय आणि धावा देणारा असतो; पण सचिन त्याच चक्रव्यूहात अडकत होता. यावर त्यानेच मार्ग शोधला. कोणत्याही परिस्थितीत कव्हर ड्राइव्हचा फटका मारायचा नाही.
सचिनने २४१ धावांच्या त्या खेळीसाठी ४३६ चेंडूंचा सामना केला आणि १० तास फलंदाजी केली; पण त्यात त्याचा निश्चय कोठेही ढळला नव्हता. ती एकाग्रता पराकोटीची होती. आता त्याच्या यंदाच्या वाढदिवसाला सचिनच्या त्या खेळीतील ‘व्हॅगन व्हिल’द्वारे सचिन एकाग्रतेत आणि निश्चयात किती महान होता, हे तर इरफानला त्याच्या पोस्टमधून स्पष्ट करायचेच होते; पण त्यातून इतरांनाही बोध द्यायचा होता.
त्यामुळे इरफानच्या शुभेच्छांची चर्चा झाली. विशेष म्हणजे, २४ तारखेलाच बंगळूरचा राजस्थानविरुद्ध सामना झाला, त्यात विराट ७० धावांची खेळी करत असताना इरफानने त्याचे कौतुक केले. ‘विराट कोहलीकडून आणखी एक जबरदस्त खेळी... १०० होणार?’ अशी पोस्ट केली. आता पुढच्या काळात इरफान पठाण पुन्हा समालोचकांच्या टीममध्ये परतरणार की अघोषित बंदी कायम राहणार, याची उत्सुकता असेल.
अलीकडेच सचिन तेंडुलकरचा वाढदिवस झाला. पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे सचिनने वाढदिवस साजरा केला नाही; पण सोशल मीडियावर शुभेच्छांचा ओघ मात्र कायम होता. त्यात माजी अष्टपैलू आणि समालोचक इरफान पठाणची पोस्ट फारच चर्चेत राहिली...
विराटभाऊ जरा दमानं...
प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज बाद झाल्यावर विराट कोहलीची मैदानावरची कृती इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा अतिशय जोशपूर्ण असते. कधी कधी ती अतिरेकासारखीही असते. पंजाब किंग्स संघाबरोबच बंगळूर संघाचे तीन दिवसांच्या आत दोन सामने झाले. त्यातील पहिल्या सामन्यात बंगळूर संघाची दाणादाण उडाली आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
नंतरच्या सामन्यात बंगळूरने पराभवाची परतफेड केली आणि विजयी फटका मारल्यानंतर विराटने पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरला जणू काही खिजवणारी ॲक्शन केली. अनेकांना ती पटली नाही.
ही आयपीएल आहे, भले तू पहिल्यावहिल्या विजेतेपदासाठी आसूसलेला असशील; पण ज्याला पाहून तू कृती केलीस तो तुझा भारतीय संघातील सहकारी आहे. याचा विसर पडला होता की काय... विराटभाऊ जरा दमानं... अशी चर्चा सुरू झाली.