वेध साताऱ्यातील कर्तृत्ववानांचा...
esakal April 27, 2025 11:45 AM

अरुण गोडबोले

editor@esakal.com

‘सकाळ’ पुण्याबरोबरच साताऱ्यातही लोकप्रिय अग्रेसर वृत्तपत्र आहे. निःस्वार्थी व सक्षम पत्रकार ही सकाळची तेव्हा आणि आजही मोठी ताकद. श्रीकांत कात्रे हेसुद्धा त्याच मुशीतील पत्रकार. ते सातारचे असल्यामुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचे कार्य व महत्त्व त्यांना माहीत होते. त्यातूनच २००१ मध्ये त्यांना सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा परिचय करून देणारी मालिका सकाळमधून लिहिता आली. त्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वांमुळे त्या मालिकेचे यथार्थ नामानिधान प्रकाशरेषा असे केले.

प्रकाशरेषा रेखाटलेल्या व्यक्तिचित्रांचे व त्यांच्या कार्याचे महत्त्व आजच्या पिढीला माहीत नाही. ते व्हावे या हेतूने श्रीकांत कात्रे यांनी २४ वर्षांनी शिरीष चिटणीस यांच्या सक्रिय सहकार्याने प्रकाशरेषा नावानेच हे लेख संग्रहित करून पुस्तकाच्या स्वरूपात प्रसिद्ध झाले, ही अभिनंदनीय बाब आहे.

या पुस्तकात श्रीकांत कात्रे यांनी शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक, कला, बँकिंग, राजकीय, क्रीडा व इतर अशा क्षेत्रांत भरीव कामगिरी करणाऱ्या एकूण ५५ व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून दिला आहे. यातील काही व्यक्ती वाचकांना माहिती असतील तर काही माहितीसुद्धा नसतील. त्यामुळे आजच्या पिढीने त्यांचे कर्तृत्व जाणून त्यांचा आदर्श समोर ठेवून स्वतःही काही तसेच कार्य करण्याचा निश्चय केला तर कात्रे यांच्या परिश्रमाचे व प्रतिभेचे चीज होईल.

या स्वकर्तृत्वाच्या प्रकाशरेषा ओढणाऱ्या व्यक्तींमध्ये प्राचार्य देवदत्त दाभोळकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, बॅरिस्टर पी. जी. पाटील या विद्वानांच्या बरोबरीने लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर आहेत आणि अध्यात्मिक क्षेत्रांतील मारुतीबुवा भोसले रामदासी यांच्याबरोबरीने प्राणिकल्याणासाठी कार्य करणाऱ्या साहिराबी सय्यद यांच्या कर्तृत्वाचा परिचय कात्रे करून देतात.

त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या कार्याचाही गुणगौरव करतात. कात्रे यांची भाषा सरळ, सोपी आहे आणि त्यांच्यावर वृत्तपत्रीय जागेचे बंधन असल्यामुळे त्या लेखनात एक वेगळे नेमकेपण आहे. लेखनाची भाषा अनलंकृत आहे आणि अनलंकृत हाच एक अलंकार आहे, असे मला वाटते. डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या मर्मग्राही प्रस्तावनेने या पुस्तकाचा बहुमान केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.