'कॅफे रेसर'ची दुनिया
esakal April 27, 2025 11:45 AM

बहुतांश मंडळी आपली जुनी गाडी विकतात आणि नवीन खरेदी करतात. काळानुसार गाडीची किंमत कमी होते आणि अगदी पडत्या भावात त्याची विक्री करावी लागते; मात्र एका बाइकप्रेमी तरुणाने आपल्या जुन्या बाइकमध्ये बदल करत त्याला अधिक आकर्षक रूप दिले.

मध्य प्रदेशातील इंदूर येथील शरद विश्वकर्मा नावाच्या तरुणाने दोन वर्षांपूर्वी वडिलांच्या जुन्या स्प्लेंडरला कॅफे रेसरचा चेहरा दिला. ही गाडी त्याच्या वडिलांनी चालवलेली असल्याने त्यांच्या आठवणी जोपासण्यासाठी त्याने त्याची विक्री करण्याऐवजी बदल करत वापर सुरू ठेवला.

अर्थात आपल्याकडे कॅफे रेसरला मान्यता आहे; परंतु कायद्याच्या चौकटीत. त्याने टायरपासून ते हेडलाइटपर्यंत सर्वकाही बदलले. अनेक सुटे भाग त्याने अन्य शहरांतून मागविले. चार महिन्यांच्या अथक परिश्रमातून कॅफे रेसर नावारूपास आली.

कॅफे रेसर ही सामान्य दुचाकी वाहनांच्या तुलनेत अगदी वेगळी भासते. एखाद्या तरुणाला स्टँड कॉलरचा टी-शर्ट आवडतो, तर एखाद्याला राउंड नेकचा. काहींना जॅकेट परिधान करावयास आवडते तर काहींना लूज शर्ट. हीच मात्रा वाहनालाही लागू पडते. तरुणांना एकसारखी बाइक नको असते आणि त्यातूनच कॅफे रेसरसारखी बाइक जन्माला येते.

अशावेळी नामांकित कंपन्यांबरोबरच स्थानिक पातळीवरही कॅफे रेसर बाइक आणण्याचा ट्रेंड पाहावयास मिळत आहे. कॅफे रेसर ही १९५०-६०च्या दशकात ब्रिटनमध्ये नावारूपास आली. वेगवान आणि वजनाला हलकी असणारी बाइक ही शॉर्ट डिस्टन्स रेसिंग किंवा ‘कॅफे टू कॅफे’ धावण्यासाठी तयार केली. म्हणूनच तिचे नाव ‘कॅफे रेसर’ पडले.

त्या काळात ब्रिटनमधील तरुणांनी स्टँडर्ड बाइक्समध्ये सुधारणा करत त्या रेसिंगसारख्या बनवल्या. पूर्वी ते बाइक घेऊन कॅफे ते कॅफेदरम्यान स्पर्धा करत असत. म्हणून तिला कॅफे रेसर नाव पडले. या ठिकाणी कॅफे रेसरसारखी कामगिरी करणाऱ्या काही बाइकची माहिती देता येईल.

दुचाकी वाहन आता केवळ गरज राहिली नसून, ती हौसेचा भागही ठरत आहे. दैनंदिन कामाबरोबरच भटकंती करण्याची इच्छा असलेल्या बाइकस्वारांसाठी कंपन्या वैशिष्ट्यपूर्ण वाहने आणत आहेत.

जबरदस्त इंजिन, प्रचंड वेग, आकर्षक रचना अशी बलस्थाने असलेल्या दुचाकी वाहन श्रेणीतील कॅफे रेसर बाइक तरुणाईचे लक्ष वेधून घेत आहेत. अर्थात कॅफे रेसरला पाच ते सहा दशकांचा इतिहास असला, तरी त्यांची व्याप्ती अलीकडच्या काळात वाढली आहे.

टीव्हीएस रोनीन

तरुणाईत वेगळ्या लूक्स आणि आरामदायक राइडिंग असलेल्या बाइक्सची मोठी क्रेझ आहे. या पार्श्वभूमीवर क्रूझर स्टाइल टीव्हीएस रोनीनमध्ये ‘कॅफे रेसर’प्रमाणे बरेच बदल झाले आहेत. ती रेट्रो, स्क्रॅम्बलर आणि स्ट्रीट क्रूझर यांचे परिपूर्ण मिश्रण आहे.

गोल एलईडी हेडलॅम्प, मोठा फ्युएल टँक, ब्लॅक्ड-आउट पार्ट्स आणि स्क्रॅम्बलर स्टाइल सीट्स यामुळे ती पारंपरिक बाइकमध्ये लक्ष वेधून घेते. २२५.९ सीसीची रोनीन ३५ ते ४० किलोमीटर प्रती लिटर मायलेज देते.

बीएमडब्लू आर १२ नाइन टी

‘बीएमडब्लू आर नाइन टी’ ही कॅफे रेसर्स डिझाइनपासून प्रेरणा घेत तयार केलेली एक हेरिटेज क्लासिक बाइक आहे आणि म्हणूनच शहरात चालविताना आरामदायी रायडिंग पोझिशन देणारी आहे. ही बाइक म्हणजे स्टाइल, परफॉर्मन्स आणि हेरिटेज यांचा परिपूर्ण संगम आहे.

क्लासिक डिझाइन आणि दमदार इंजिन परफॉर्मन्स असा दोन्हींचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी या वाहनाची रचना करण्यात आली. या बाइकमध्ये ११७० सीसी इंजिन १०९ एचपी ऊर्जा आणि ११६ एनएमचा टॉर्क जनरेट करते. बीएमडब्लू आर १२ नाइन टीमध्ये क्लासिक फ्युएल टँक, गोल एलईडी हेडलॅम्प आहे.

कॉन्टिनेंटल जीटी ६५०

1) रॉयल एन्फिल्डची कॉन्टिनेंटल जीटी ६५० ही कॅफे रेसर बाइक म्हणून ओळखली जाते. तिची रचना रेट्रो आणि स्पोर्टी आहे. क्लासिक फ्युएल टँक, सिंगल सीट, क्लिप-ऑन हँडलबार्स आणि ड्युअल एग्झॉस्टच्या बळावर ती एक परिपूर्ण कॅफे रेसर आहे.

2) बाइक मालकास दमदार परफॉर्मन्स, जबरदस्त लूक्स आणि हेड टर्निंग प्रेझेन्स मिळतो आणि शिवाय कस्टमायजेझनासाठी मोकळीक आहे. वाहनाचे ६४८ सीसीचे ट्विन सिलिंडर, एअर ऑईल कुल्ड इंजिन ४७ बीएचपीची ऊर्जा आणि ५२ एनएमचा टॉर्क जनरेट करते. कॉन्टिनेंटलचा कमाल वेग १७० किलोमीटर प्रतीतास आहे. साधारणपणे २५ ते २८ किलोमीटर मायलेज मिळतो.

हस्क्वार्ना व्हिटपिलन २५०

1) भारतीय वाहन बाजारात सध्या रेट्रो लूक बाइकला मागणी वाढली आहे. या श्रेणीत हस्क्वार्ना व्हिटपिलन २५० या बाइकचा समावेश करता येईल. या बाइकमध्ये २४८.७६ सीसीचे इंजिन असून ती रस्त्यावर दमदार कामगिरी करते. रेट्रो व्हिटपिलनची रचना ही कॅफे रेसरसारखी आहे.

2) जादा क्षमतेचे इंजिन असूनही तीस किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. या बाइकचे एकूण वजन १६१ किलो असल्याने त्यास रस्त्यावर सहजपणे नियंत्रित करता येते. यात ९.५ लीटर क्षमतेची इंधन टाकी असून सहा स्पीड ट्रान्समिशन आहे. आसनाची उंची ८३५ एमएम असून त्यामुळे कमी उंचीचेही रायडर सहजपणे हस्क्वार्ना चालवू शकतात.

कॅफे रेसरची वैशिष्ट्ये

  • रेट्रो लूक : १९६०च्या दशकातील मोटरसायकल स्टाइल

  • लॉ सिटिंग पोझिशन : रेसिंगप्रमाणे पुढे झुकून चालवावी लागते.

  • हलक्या वजनाचा आराखडा : बाइक हलकी आणि वेग देणारी आहे.

  • एक आसनी : स्पोर्टी लूक देणारी एक आसनी.

  • क्लासिक हेडलाइट : साधा गोल हेडलाइट, एलईडी मॉडर्न व्हर्जनमध्येही येतो

  • क्लिप-ऑन हँडलबार्स : पुढे झुकवणारे, रेसिंग स्टाइल हँडलबार

  • शॉर्ट एग्झॉस्ट : लक्ष वेधून घेणारे आणि मोठा आवाज करणारे एग्झॉस्ट

कस्टमाईज्ड कॅफे रेसर

नामांकित कंपन्याव्यतिरिक्त व्यक्तिगत पातळीवरदेखील आपल्याला हवी तशी बाइक तयार करू शकतो. यास आपण ‘कस्टमाईज्ड बाइक’ म्हणू शकतो आणि कॅफे रेसरची हीच मूळ संकल्पना आहे.

उद्योजक मुकुल नंदा आणि त्याचे बंधू माजी क्रिकेटपटू युवराज सिंह यांनी पुण्यात दहा ते बारा वर्षांपूर्वी ऑटोलॉग डिइााइन नावाची कंपनी सुरू केली. ग्राहकांच्या पसंतीनुसार वाहनाचे डिझाइन तयार करणे हा त्यांचा प्रमुख उद्देश. याबाबत मुकुल नंदा म्हणतात, ‘अलीकडच्या काळात बदलत्या वाहन संस्कृतीच्या उत्सुकतेपोटी कंपनी सुरू करण्याची कल्पना आकारास आली.

बोल्ट ऑन किट्स (थेट जोडण्यात येणारे सुटे भाग) आणि त्याच्या सौंदर्यात भर घालणारे सुटे भाग तयार करण्यावर आमचा भर राहिला आहे. या माध्यमातून मोटारसायकल मॉडिफाय केली जाते.’ अर्थात ते संपूर्णपणे मोटारसायकल तयार करत नाहीत; मात्र एखाद्या ब्रँडने कस्टम प्रोजेक्ट दिल्यास यानुसार काम करण्यात येते.

नंदा म्हणतात, ‘आमचे मुख्य रिटेल प्रॉडक्ट बोल्ट ऑन किट्स आहे. वाहनात लवकर बसणारा सुटा भाग तयार करताना प्रत्यक्षात खूप वेळ लागतो. यासाठी मार्केट रिसर्च, रायडरचा फीडबॅक, थ्री डी डिझाइन आणि चाचणीची मदत घेतली जाते.

साधारणपणे एखाद्या वाहनाची रचना करताना आणि बाजारात आणण्यासाठी दोन ते सहा महिन्यांचा काळ लागू शकतो. कस्टमाईज्ड बाइकचा ट्रेंड प्रदेशानुसार वेगवेगळा असतो. मुंबई, पुणे, नवी दिल्ली येथील तरुणांची आवडनिवड सारखीच असेल असे नाही.

प्रामुख्याने जीवनशैली, स्थानिक संस्कृती आणि सोशल मीडियातील ट्रेंड यावर कस्टमाईज्ड वाहनांचा ट्रेंड अवलंबून असतो. यातही अनेक वर्षांपासून रायडरच्या मनावर रुंजी घालणारा कॅफे रेसर ही वजनाने हलकी, काही वेळा कमी आकाराची आणि वेगवान म्हणून ओळखली जाते.

आजही जगभरातील उत्पादकांना कॅफे रेसर निर्मितीचे आकर्षण आहे. अर्थात एखाद्या रायडरला आवडलेले डिझाइन हे दुसऱ्या रायडरला आवडेल असे नाही. येथेच कस्टमाईजेशन महत्त्वाची भूमिका बजावते.’’

कस्टमाईजेशन म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या व्यक्तिमत्त्व फुलविणे. हेच काम बाइकची पुनर्बांधणी करणाऱ्या कंपन्या करत असतात; मात्र वाहनात बदल करताना आरटीओची परवानगी घेणे बंधनकारक असते.

यासाठी कागदपत्रांत बदल करून घेणे अनिवार्य असते. यानंतर आरटीओकडून कस्टमाईज्ड वाहनांची तपासणी करते आणि निकषाचे पालन झाले आहे की नाही, याची चाचपणी करते. शिवाय विमा कंपनीलादेखील बदल कळवावा लागतो आणि यानुसार हप्त्यात बदल होतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.