'ठिबक'मुळे साधली उन्नती
esakal April 27, 2025 11:45 AM

कुंडलिक पाटील

saptrang@esakal.com

जिल्ह्यासह राज्यभरात सहकारी पाणीपुरवठा संस्थांची चळवळ आर्थिक अडचणीत आली आहे. यातच पाणीटंचाईमुळे उत्पादनात घट होत आहे; मात्र कारभारवाडी येथील कै. शिवा रामा पाटील पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून १०२ एकर क्षेत्र ठिबकखाली आणले. ठिबकमुळे एकरी ५० टक्के पाण्याची बचत होऊन उसाचे उत्पादन सरासरी ६५ टक्केपेक्षा अधिक वाढले. सामूहिक तत्त्वावरील ठिबक सिंचनमुळे पाण्यावरून होणारे तंटे पूर्ण बंद झाले आहेत.

तसेच शेतकरी संवाद सुरू झाल्यामुळे बांधावरील तंटेही मिटले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून एकरी फक्त ४ हजार ५०० रुपये पाणीपट्टी घेणारी ही एकमेव संस्था आहे. ‘सकाळ ॲग्रोवन’ मधील एका यशोगाथेने संस्थेला पर्यायाने गावाच्या अर्थकारणाला विकासाला चालना दिली आहे. यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) उपयोग करून पाणीपुरवठा संस्थेचा कारभार आणखी तंत्रस्नेही करण्यात येणार आहे.

अभ्यास, जागृती आणि कार्यवाही

प्रा. डॉ. नेताजी पाटील यांनी या परिसराचा अभ्यास करून येथील पाणीव्यवस्था सुधारण्यासाठी काय करता येईल, यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली. त्यांनी गावातीलच बंद पडण्याच्या अवस्थेतील पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून २०११ पासून परवडणाऱ्या शेतीचा प्रयोग सुरू केला. या संस्थेत एक गुंठ्यापासून दोन एकरापर्यंत शेतकरी सभासद बनले. पाट पाण्याने पाणी देत असताना गावागावांत, भावकीत पाण्यासाठी भांडणे होत असत. राजकारणामुळे शेतकऱ्यांचा एकमेकांसोबतचा संवाद कमी होत होता.

२०११ नंतर खासगी पाइप लाइन टाकण्याचे प्रस्थ वाढले आणि सहकारी पाणीपुरवठा संस्था अडचणीत येऊ लागल्या. अशावेळी प्रा. पाटील यांनी संस्थेच्या कामकाजात सहभाग घेऊन शेतकऱ्यांमध्ये संवाद वाढवून, एकत्र येण्याचे फायदे समजून सांगितले. कृषी विभागाच्या वतीने शेती शाळा सुरू करून शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाचे फायद्यांवर भर दिला. त्यानंतर २०१२ मध्ये संस्था रजिस्टर केली व काटकसरीच्या कारभाराला सुरुवात झाली. त्या वेळी प्रति वर्ष तीन लाखांचा व्यवहार असणाऱ्या संस्थेत दीड लाख रुपये शिल्लक राहू लागले. यातून शेतकऱ्यांचा विश्वास वाढत गेला ‘आणि पुढील तीन वर्षांत साडेचार लाख रुपये शिल्लक राहिले. पाटपाणी, दुष्काळी परिस्थिती यामुळे एकरी १६ ते २० टन उत्पादन होते. सुरुवातीला गट शेतीची स्थापना केली. यानंतर शेतीशाळा, मशागत तंत्रज्ञान, बियाणे निवड, लागण पद्धत, खोडवा व्यवस्थापन उपक्रम सुरू केले. यामध्ये सुरुवातीला ६५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

‘सकाळ ॲग्रोवन’ मुळे कलाटणी

सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी व अहिरवाडी येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ठिबक सिंचन योजना सुरू केल्याची यशोगाथा २०१४ मध्ये ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झाली होती. या संस्थेला कारभारवाडीतील शेतकऱ्यांनी स्वखर्चातून भेट दिली आणि त्यानंतर कारभारवाडीतील समूह ठिबक सिंचन विचाराला गती मिळाली. सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वयंचलित ठिबक सिंचन करण्याचे ठरविले. उंच सखल भूपृष्ठ व अल्पभूधारक शेतकरी यांमुळे सामूहिक ठिबक सिंचन राबविले. सर्व शेतकऱ्यांनी त्यासाठी नेटाने एकत्र प्रयत्न केले आणि आपल्या लहान लहान ५५० शेतीच्या तुकड्यांवर ठिबक पद्धतीने पाणी देण्याचे नियोजन केले. त्यासाठी प्रति एकर एक लाख रुपये खर्चासाठी ७३ लाख रुपये जिल्हा बँकेकडून व २९ लाख रुपये शेतकऱ्यांनी स्वगुंतवणूक केली आणि संपूर्ण कारभारवाडी गावासाठी सामूहिक ठिबक सिंचन प्रकल्प सुरू झाला. या वेळी शेतकऱ्यांनी एकत्रित शेतात उसाची रोपे तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन इतिहासात प्रथमच ६५ एकरवर रोपे तयार केली व त्याची लागण केली.

पाण्याची बचत : ठिबकमुळे ५० टक्के पाण्याची बचत झाली. ज्या भागामध्ये चार महिने पाऊस पडतो, त्या ठिकाणी एकरी एक कोटी १० लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते. कारभारवाडीत ठिबक सिंचन सुरू झाल्यानंतर ५० टक्के पाण्याची बचत होऊन तेच काम ५५ लाख लिटर पाण्यात होऊ लागले.

विजेची बचत : आवश्यकतेनुसार आवश्यक वेळी पाणी देणे शक्य झाल्यामुळे विजेचा वापर कमी होऊन ३२ टक्के विजेची बचत झाली.

रासायनिक खतांचे नियोजन : पूर्वी उसाला खते विस्कटून दिली जात असत. त्या वेळी खतांची कार्यक्षमता फक्त ३५ टक्के होती. हे मुळाच्या कक्षेच्या खाली जाणे, हवेत उडून जाणे व पाटपाण्यातून शेतातून ओढ्यात व नदीत जात होते. ठिबक सिंचन सुरू झाल्यानंतर रासायनिक खते द्रव रूपात देणे शक्य झाले. त्यामुळे खतांची कार्यक्षमता ८५ ते ९० टक्केपर्यंत वाढली.

उत्पादन वाढले : प्रारंभी १६ ते २५ टन ऊस उत्पादन होते. ठिबकनंतर यामध्ये ६५ टक्केने वाढ होऊन सुमारे ४० ते ८५ टन एकरी उत्पादन मिळू लागले. काही शेतकऱ्यांचे उत्पादन १०० टनांवर गेले. हे शेतकरी एकरी ११ हजार रुपये उत्पन्न मिळवत होते. त्यातून गावात निव्वळ उत्पन्न ६ ते १० लाख रुपये येत होते. ठिबकनंतर उसाबरोबर भाजीपाला व फुलशेतीमध्ये वाढ होऊन गावाचे उत्पन्न ५० लाखांवर पोहोचून अर्थकारणास गती मिळाली.

तणांचा प्रादुर्भाव कमी : ठिबकमुळे दिले जाणारे पाणी वाळूच्या व जाळीच्या फिल्टर मधून गाळून दिले जात असल्याने व प्रत्यक्ष मुळाजवळच दिल्याने तणांचा प्रादुर्भाव ७० टक्के कमी झाला.

जमिनीचा पोत सुधारला : ठिबकमुळे मातीला वापसा अवस्था राहून जमीन भुसभुशीत होऊन जमिनीतील जिवाणूंचे प्रमाण वाढीस लागून जमिनीचा पोत सुधारला.

आंतरपिकांतून विकास : अनेक शेतकऱ्यांनी उसात आंतरपीक म्हणून भाजीपाला, फुलशेती केली. स्ट्रॉबेरीची शेती होऊ लागली. यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली.

गट शेती अनुदान : शेतावर मशागतीसाठी २०१८/१९ मध्ये गट शेतीच्या माध्यमातून एक कोटी अनुदान मिळाले. या अनुदानातून अवजार बँकेची खरेदी केली. तीन ट्रॅक्टर व सर्व अवजारे घेतले असून शेतीच्या मशागतीमुळे गती आली आहे.

हायटेक शेती : एक एकर शेतीवर ग्रीन हाउस सुरू केले. त्याबरोबर शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारून, मिरची कांडप, तेल घाणा, शेवया मशीन, ओला मसाला तयार करणे, मिनी राइस मिलच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध झाला.

रसायनविरहित गूळ प्रकल्प : गटाच्या माध्यमातून कोल्हापूरचा ‘जीआय’ मानांकित रसायनविरहित असा गूळ प्रकल्प सुरू केला गेला. कारभारी गोडवा या नावाने ब्रँड रजिस्टर करून देशात व देशाबाहेर गुळाला बाजारपेठ मिळाली. या बरोबर पिंपळगाव येथे दुसरा गूळ प्रकल्प सुरू केला.

भविष्यातील योजना...

कोल्ड स्टोरेज नियोजन : शेतमाल साठवणुकीसाठी तसेच तयार झालेल्या गुळासाठी संस्थेच्या माध्यमातून शीतगृह उभे करण्याचे नियोजन आहे.

जिवाणू कल्चर : गूळ प्रकल्पातून बाहेर पडणारे पाणी या गुळाच्या पाण्यावर जिवाणू कल्चर तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्याचा मानस आहे. यातून रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचा संस्थेचा कल आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजंन्स (एआय तंत्रज्ञान) : स्वयंचलित ठिबक सिंचन नंतर संस्था आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पाणी वापर, खत व किडीचे व्यवस्थापन करणे प्रस्तावित आहे. त्यासाठी मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी व भारतातील आयआयटी तसेच केव्हिके यांचा सहभाग घेतला जात आहे. या माध्यमातून ५० टक्के पाण्याची बचत होऊन ३५ ते ४० टक्के उत्पादन वाढीचे प्रयत्न आहेत.

कारभारवाडीत सन १९७२ मध्ये सामूहिक तत्त्वावरील खासगी पाणीपुरवठा संस्था उदयास आली. सन २०१२ मध्ये हिच संस्था निबंधकांकडे नोंदणीकृत केली. आज या संस्थेत १३१ शेतकरी असून ठिबक सिंचनच्या माध्यमातून १०२ एकर भिजक्षेत्र बनले आहे. ठिबकमुळे गावची आर्थिक उन्नती साधलीच पण तंटेही कमी झाले.

समूहशेती काळाची गरज

पुढील काळ शेतीचा असणार आहे. समूह शेती ही काळाची गरज आहे. पारंपरिकसोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतीतील उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवणे, एकत्र येऊन संवाद साधणे, गावातील तंटे गावातच मिटविणे, शेतकऱ्यांचे आरोग्य सुधारणे, मुलांना गुणवत्तायुक्त शिक्षण देणे, गावातच रोजगार उपलब्ध करणे, कृषी विकासासाठी प्रयत्न करून त्यातून स्वयंपूर्ण ग्रामविकास साधणेही संकल्पित आहे.

-प्रा. डॉ. नेताजी पाटील

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.