खुर्ची हा आपला अजेंडा नाही
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : ‘महाराष्ट्रातील जनतेला सोन्याचे दिवस आणण्यासाठी कामे करायची आहेत. अनेक प्रश्न सोडवायचे आहेत, त्यामुळे खुर्ची हा आपला अजेंडा नाही,’ असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ठाण्यात अकोले आणि अहिल्यानगर येथे विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा शनिवारी (ता. २६) रात्री पार पडला. या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. तसेच ‘लाडका भाऊ’ ही ओळख ‘सर’ पदापेक्षा मोठी असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
जनता आणि कार्यकर्ते हे माझे टाॅनिक असल्याची सांगत, महाविकास आघाडी सरकारने बंद केलेल्या योजना आपण महायुतीचे सरकार येताच सुरू केल्याचेदेखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ‘सत्तेच्या मोहापायी, सत्तेच्या खुर्चीसाठी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण सोडली, बाळासाहेबांना जे नको होते ते तुम्ही केले, शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली. ती सोडविण्यासाठी मी अडीच वर्षांपूर्वी पावले उचलली. जे गेले ते गद्दार, कचरा असे हिणवले जाते. जे केले ते शिवसेना वाचविण्यासाठी केले. मी जे केले ते जनतेने स्वीकारले. त्यामुळे ८० पैकी ६० जागा आपल्या निवडून आल्या,’ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले.
..
शिंदे गटात प्रवेश
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एकूण १६८ ग्रामपंचायती आहेत. त्यातील ६५ ग्रामपंचायतींचे सरपंच, पंचायत समितीचे माजी सभापती, लोकप्रतिनिधी, दूध संघाचे पदाधिकारी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी या सर्वांनी शिंदेंच्या शिवसेनेत शनिवारी जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे सचिव राम रेपाळे, जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, पंचायत समितीचे माजी सभापती मारुती मेंगळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी हा पक्षप्रवेश केला.