जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द केला. यामुळे पाकिस्तान संतापला आहे. पाकिस्तानी नेत्यांकडून भारताला धमकी देणारी वक्तव्य केली जात आहे. तसेच पाकिस्तानला भारताकडून होणाऱ्या कारवाईची भीती आहे. आता पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली आहे. रावळपिंडीत माध्यमांशी बोलताना अब्बासी यांनी भारताने पाकिस्तानचे पाणी थांबवल्यास आम्ही कारवाई करणार असल्याचे म्हटले.
हनीफ अब्बासी म्हणाले की, ‘ आमच्या क्षेपणास्त्रांची दिशा भारताकडे आहे. भारताने कारवाई केली तर त्याचे प्रत्युत्तर दिले जाईल. आमच्याकडे जगातील सर्वात शक्तीशाली अणुबाँब आहे. आमच्याकडे गौरी, शाहीन, गझनवीसह 130 अणूबॉम्ब आहे. आम्ही राजनैतिक प्रयत्नांसोबतच आमच्या सीमांचे रक्षण करण्याची पूर्ण तयारी केली आहे. पहलगाम हल्ला हा फक्त एक निमित्त आहे.
पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) पक्षाचे हनीफ अब्बासी नेते आहे. त्यांनी जमात ए इस्लामी सदस्याच्या माध्यमातून राजकीय करियर सुरु केले. जून 2012 मध्ये अब्बासीविरुद्ध 500 किलो इफेड्रिन औषधांचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला होता.
पाकिस्तानी रेल्वे पाकिस्तानी लष्कराच्या मदतीसाठी नेहमी तयार असल्याचे हनीफ यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, लष्कराला जेव्हा गरज असेल तेव्हा रेल्वे उपलब्ध करुन देणार आहे. यापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी नि:शस्त्र पर्यटकांवर गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हटले होते. तसेच पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताविरुद्ध प्रक्षोभक भाषण केले होते. सिंधू नदीत भारतीयांचे रक्त वाहील, अशी धमकी त्यांनी दिली होती.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तान दशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचे कबुल केले होते. दहशतवादाला पाठिंबा, प्रशिक्षण आणि निधी दिल्याचे त्यांनी म्हटले होते. अमेरिका आणि पाश्चात्य देशांसाठी हे काम आम्ही केले, त्याची किंमत आम्हाला चुकवावी लागल्याचे आसिफ यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.