Khanapur: आमदार गोपीचंद पडळकर यांच्याहस्ते खानापुरात महाआरती; मंदिरातील नंदीची विटंबना, हिंदूंनी बाहेर पडायला हवे..
esakal April 27, 2025 06:45 PM

खानापूर : येथील महादेव मंदिरातील नंदीच्या विटंबनेच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाकडून आज महादेव मंदिरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते महाआरती झाली. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

याप्रसंगी आमदार पडळकर म्हणाले, ‘‘शहरातील महादेव मंदिरात झालेल्या या कृत्यामागे जो कुणी आहे, त्याला पोलिस विभाग अटक करेल आणि शिक्षा देईल. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत आहे की, खानापूर शहराचे नाव भवानीपूर करावे, सुलतानगादे या गावाचेही नाव बदलावे. जत तालुक्यातील उमदी गावाचे नावही बदलावे. मुघलांच्या खुणा जिथे असतील, त्या पुसण्याच्या दृष्टिकोनातून जी काही पूर्वीची नावे आहेत, ती पूर्वीची नावे देण्यात यावीत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.’’

‘‘सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे. यातून हिंदूंनी बाहेर पडायला हवे. सर्वधर्मसमभाव पाळण्याची जबाबदारी केवळ हिंदूंची आहे का? हिंदू, मुस्लिम भाई भाई असं म्हटलं जातं; मग जम्मू-काश्मीरमध्ये धर्म विचारून फक्त हिंदू लोकांवरच का गोळ्या घातल्या गेल्या,’’ असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. दरम्यान, शहरात या घटनेमुळे सलग दोन दिवस तणावाचे वातावरण असल्याने सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त होता. सकाळच्या सत्रात माँसाहेब दर्गा परिसरात पोलिसांचा ताफा यंत्रणेसह सज्ज होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.