बुलडाणा - ‘महाराष्ट्रातील १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाले आहेत. पोलिस त्यांना शोधून कारवाई करतील. अशा लोकांना जे आश्रय देतील त्यावरही राज्य सरकारकडून कारवाई केली जाईल,’ असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. यापुढे आमचा शिवसैनिक देखील या देशसेवेच्या कामात मागे राहणार नाही. देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानासारखा लढणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
शिंदे हे आभार दौऱ्यानिमित्त बुलडाणा येथे आले होते. त्यावेळी टिळक क्रीडा नाट्य मंदिराच्या प्रांगणात झालेल्या सभेला उद्देशून बोलताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय राठोड, माजी आमदार संजय रायमूलकर, आनंदराव अडसूळ, शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे आणि बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. पहलगामध्ये झालेला हल्ला हा शेवटचा हल्ला असेल यापुढे हल्ला करण्याचे धाडस त्यांच्यात उरणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की, एवढ्या कडक उन्हाळ्यातही जनतेची उपस्थिती ही प्रेमाच्या पावसात भिजविणारी आहे. मतदारांचे असे प्रेम सगळ्यांच्या नशिबात नसते. म्हणूनच मी मुख्यमंत्री जेव्हा होतो तेव्हा देखील एक कार्यकर्ता म्हणूनच मी काम केले आणि आजही कार्यकर्ता आहे आणि भविष्यातही कार्यकर्ता म्हणून काम करीत राहीन.
बुलडाण्यामध्ये खासदार आणि आमदार हे दोन्ही जनतेने शिवसेनेचे निवडून दिले. त्यामुळे येथील राजकीय तापमान शिवसेना वाढवत आहे. त्याचे जोरदार चटके विरोधकांना बसले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
दुष्काळाचा विषय मार्गी लावणार
एकनाथ शिंदे म्हणाले, की सरकारमध्ये काम करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या पाण्याचा पहिला निर्णय घेतला असेल. विदर्भ, मराठवाड्याचा दुष्काळ संपविण्याचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहेत. महायुतीच्या सरकारने दीडशे प्रकल्पांना मान्यता दिली.
आमदार, खासदारांना मतदारसंघासाठी निधी मिळवून दिला. लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये देखील खोडा घालण्याचे काम विरोधकांनी केले. मात्र याच लाडक्या बहिणी व लाडक्या भावांनी विरोधकांना जागा दाखवीत विधानसभेच्या २३७ जागा आम्हाला निवडून दिल्या. हेच आमचे यश आहे.
परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा
महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजेच ‘महाहौसिंग’ने पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. शासनाच्या स्तरावरून अडचणींवर प्राधान्याने निश्चितपणे मार्ग काढला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ‘सह्याद्री’ अतिथिगृह येथे महामंडळाच्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला.