सोलापूर : चालू शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा २५ एप्रिल रोजी संपली असून २६ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या लागल्या आहेत. तरीपण, शिक्षकांना ४ मेपर्यंत शाळेत यावेच लागणार आहे. रमजान ईदची सुटी कामाच्या दिवशी (वर्किंग डे) घेतल्याने शिक्षकांची उन्हाळा सुटी एक दिवस लांबली आहे.
दरवर्षी शैक्षणिक वर्षातील २२० दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन होणे आवश्यक आहे. त्यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे दिवस वगळून शैक्षणिक वर्षात किमान ८०० तास तर इयत्ता सहावीच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांचे एक हजार तास अध्यापन बंधनकारक आहे. त्यानुसार अध्यापनाच्या तासांचे नियोजन अपेक्षित असते. या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंतिम सत्र उरकण्याची शाळांची पद्धत बंद केली.
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातून सुरू झालेली अंतिम सत्र परीक्षा २५ एप्रिलपर्यंत चालू राहिली. आता १ मे रोजी शाळांकडून विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल (प्रगतीपत्रक) जाहीर होईल, त्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. निकालानंतरही शिक्षकांना पुढचे चार दिवस शाळेत यावे लागणार आहे. दरम्यान, पटसंख्या कमी होत असल्याने अनेक शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार असल्याने पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षकांना पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
दरवर्षी शिक्षकांना १२८ दिवस सुट्या
दरवर्षी शैक्षणिक वर्षात शिक्षकांना तथा शाळांना १२८ दिवस सुट्या असतात. ७६ सार्वजनिक सुट्या असतात आणि त्यात उन्हाळा, दिवाळी सुट्या असतात. याशिवाय वर्षात ५२ रविवार देखील येतात. वर्षातील ३६५ दिवसांतून २३७ दिवस उरतात, पण त्यात अध्यापनाचे तास ठरल्याप्रमाणे व्हायला पाहिजेत असा नियम आहे.
५ मेपासून शाळांना उन्हाळी सुट्टी
विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या असून शिक्षकांना ५ मेपासून उन्हाळा सुट्या असतील. पुढे १५ जूनला रविवार असल्याने १६ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल. दरम्यानच्या काळात शिक्षकांनी तथा प्रत्येक शाळेने चालू पटसंख्येत किमान १० टक्के वाढ होईल, यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना केल्या आहेत.
- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर