फ्लोटर फंड - गुंतवणुकीचा उत्तम पर्याय
esakal April 28, 2025 11:45 AM

- वसंत कुलकर्णी, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार

गेल्या दोन आठवड्यांत रोखे बाजार अस्थिरतेच्या शिखरावर होता. त्यामुळे १० वर्षे मुदतीच्या सार्वभौम रोख्यांच्या परताव्यात गुंतवणूकदारांनी मोठी अस्थिरता अनुभवली. २३ मार्च ते २४ एप्रिल या काळात परताव्याचा दर ६.३२ ते ६.६३ टक्के दरम्यान राहिला. प्रत्येक वेळी वृद्धी हे गुंतवणुकीचे उद्दिष्ट असतेच असे नाही. मुद्दलाचे संरक्षण हेही एक उद्दिष्ट असू शकते.

फ्लोटिंग रेट म्युच्युअल फंड, (ज्याला फ्लोटर फंड) देखील म्हणतात, हा रोखे गुंतवणूक करणारा म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे, जो बाजाराच्या परिस्थितीनुसार चढ-उतार होणाऱ्या व्याजदरांसह कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करतो. या फंडांची रचना स्थिर परतावा देण्यासाठी केलेली असून, व्याजदर बदलत असताना त्याचा कमीत कमी परिणाम व्हावा अशा पद्धतीने ते समायोजित केलेले असतात.

फ्लोटर फंड प्रामुख्याने कॉर्पोरेट

बाँड आणि फ्लोटिंग व्याजदरांसह सरकारी रोखे आदी कर्जसाधनांमध्ये गुंतवणूक करतात. या रोख्यांवरील व्याजदर निश्चित नाहीत; त्याऐवजी, ते वेळोवेळी बाजारातील व्याजदरांनुसार समायोजित केले जातात. या रोख्यांवरील व्याजदर सामान्यत: बेंचमार्क व्याजदराशी निगडीत असतो.

आदित्य बिर्ला सन लाइफ फंड

आदित्य बिर्ला सन लाइफ फ्लोटिंग रेट फंड-रिटेल प्लॅन-ग्रोथ हा फ्लोटर प्रकारचा फंड असून, या फंडाचा एक वर्षाचा परतावा ८.३६ टक्के, तीन वर्षांचा परतावा ७.२५ टक्के आणि पाच वर्षांचा परतावा ६.६५ टक्के आहे.

किमान गुंतवणूक रक्कम १००० रुपये असून आणि फंडाच्या रेग्युलर प्लॅनचे व्यस्थापन शुल्क ०.४३ टक्के आहे. निफ्टी लो ड्यूरेशन डेट इंडेक्स ए-१ हा फंडाचा मानदंड आहे. कौस्तुभ गुप्ता आणि हर्षिल सुवर्णकर हे व्यवस्थापक आहेत.

जेव्हा व्याजदर वाढत असतात, तेव्हा तज्ज्ञ गुंतवणूकदारांना फ्लोटिंग रेट फंडांकडे जाण्याचा सल्ला देत असतात. डायनॅमिक बाँड फंड किंवा बँकिंग पीएसयू डेट फंड किंवा फ्लोटिंग रेट फंड यांनी किती शिल्लक कालावधी असणाऱ्या रोख्यांत गुंतवणूक करावी हे ‘सेबी’ने व्यवस्थापकांवर सोपविले आहे.

वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या तीन ते पाच वर्षे मुदतीच्या गरजांसाठी फ्लोटर फंड हा एक आदर्श पर्याय आहे. फ्लोटिंग रेट फंडांना त्यांच्या एकूण मालमत्तेपैकी किमान ६५ टक्के मालमत्ता ‘फ्लोटिंग-रेट’ रोख्यांत गुंतवणे बंधनकारक आहे.

भारतीय रोखे बाजारात तरल व्याजदर रोख्यांची (फ्लोटिंग-रेट) कमतरता लक्षात घेता, हे फंड सामान्यत: फिक्स्ड-कूपन रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात आणि व्याजदराच्या अदलाबदलीसारख्या (इंट्स्ट रेट स्वॅप) साधनांचा वापर करतात, ज्यायोगे स्थिर-दर प्राप्त करण्यायोग्य रोख्यांना फ्लोटिंग-रेटमध्ये रूपांतरित केले जाते. त्यामुळे वाढत्या व्याजदरांचा फायदा होतो.

मार्च २०१९ मध्ये रिझर्व्ह बँकेने रेपोदरात कपात करण्यास सुरवात केली. बँकिंग व्यवस्थेतील मुबलक रोकडसुलभतेमुळे व्याजदर घसरल्याने अल्प मुदतीचा यिल्ड कर्व्ह झपाट्याने खाली आला. तथापि, मे २०२२ नंतर व्याजदरात वाढ करण्यास सुरवात केली. सध्या दर कमी होण्याची अपेक्षा असतांना फ्लोटर फंड योग्य ठरतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.