आजची तिथी : विश्वावसु नाम संवत्सर श्रीशके १९४७ चैत्र कृ. एकादशी.
आजचा वार : संडेवार (आमरसपुरी वार!)
आजचा सुविचार : दिवसामागुनी दिवस चाऽऽललेऽऽ.. ऋतुमागुनीऽऽ ऋतुऽऽ…जिवलगाऽऽ कधी रे, येशील तूऽऽ..!
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) गेले दोन दिवस मला जे काही होत आहे, त्याला नैराश्य म्हणतात की उन्हाळ्याचा त्रास हेच समजेनासे झाले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी मी आमच्या ‘सागर’ बंगल्यातल्या विशाल डायनिंग टेबलाशी चांगला जेवायला बसलो असताना आमच्या रा. बावनकुळेसाहेबांनी घोषणा करुन टाकली की ‘इसवीसन २०३४ पर्यंत आमचे फडणवीसनानाच महाराष्ट्राचा कारभार पाहतील!’ हे ऐकून भरल्या ताटावरुन उठलो!
आणखी साडेनऊ-दहा वर्षे याच खुर्चीत काढायची म्हणजे अवघड आहे. मला काही खुर्चीचा मोह नाही. मनात आणीन, तर ही आत्ता पायलटची खुर्ची खाली करुन इतर दोघा को-पायलटांना देईन. पण को-पायलटांचे तर नक्की ठरायला हवे की नको? असो.
२०३४ पर्यंत मी याच खुर्चीत काढणार हे आता उघड झाले. ‘दोनेक वर्षात फडणवीसनाना दिल्लीला शिफ्ट होतील, मग आपणच सीएम’ हे स्वप्न महाराष्ट्रातले किमान अर्धाडझन नेते या घटकेला पाहात आहेत, हे मी खात्रीने सांगतो. बावनकुळेसाहेबांनी ही घोषणा केल्यानंतर मला ‘सागर’ बंगल्याच्या बाहेर जावेना! मला ‘सागर‘ बंगला (आता खरोखर) आवडू लागला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी येऊन ‘वर्षा’ बंगल्यावर कधी शिफ्ट होताय?’ असे सारखे विचारत असतात. त्यांना विविध कारणे देऊन मी टाळत असतो. आता मला त्यांना उत्तर द्यावेच लागणार! ‘२०२९ च्या नंतर बघू’ असे उत्तर मी यापुढे देणार आहे. ही टर्म तरी मी इथेच काढीन असे म्हणतो.
बावनकुळेसाहेबांच्या घोषणेनंतर बरेच अधिकारी आपण पर्मनंट झाल्यासारखे वागू लागले आहेत. तर काहींनी स्वेच्छानिवृत्तीची भाषा सुरु केली आहे. नोकरशाहीचे मी समजू शकतो, पण सेम टु सेम इफेक्ट राजकीय नेत्यांवरही पडावा? कालचीच गोष्ट, कामानिमित्ताने आमचे को-पायलट मा. दादासाहेब बारामतीकरांची लिफ्टमध्ये भेट झाली.
माझ्याकडे बघून त्यांचे डोळे डबडबूनच आले!! सहावा मजला लौकर आला म्हणून, नाहीतर ओठही बाहेर येऊन हुंदकासुद्धा फुटला असता!! त्यांची गाडी आणखी साडेनऊ वर्ष पुढं जाणार नाही, या जाणीवेने ते हळवे झाले असणार. चालायचेच. माझ्या तरी हातात काय आहे?
सहाव्या मजल्यावर दुसरे को-पायलट कर्मवीर भाईसाहेब (मु. पो. ठाणे) भेटले. समोर आल्या आल्या त्यांनी कोपरापासून हात जोडत ‘शुभेच्छा’ येवढेच म्हटले. मी थँक्यू म्हणावे की त्यांचे सांत्त्वन करावे, हे मला समजायच्या आतच ते निघून गेले!!
विरोधी पक्षाने तर आता बहुधा नादच सोडला आहे. हेच दहा वर्षं राहणार असतील, तर निवडणुका तरी कशाला लढवायच्या? असा संतप्त सवाल मी कानोकानी ऐकला. पण हे सारे परस्पर चालले आहे. मला नेमके कुठे जायचे आहे, हे कुणी मला विचारणार आहे की नाही?
आणखी दहा वर्षे या एका खुर्चीत काढायची या कल्पनेने काळजाचा ठोका चुकतो, आणि क़ुठे तरी मनात बरेदेखील वाटते. याला विश्वास म्हणायचे की शिक्षा? काहीही असो, मी पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. पक्ष सांगेल, तिथे बसेन. घरी जा सांगितले तरी तिथेच बसेन आणि दहा वर्षे इथेच बसा असे सांगितले तरी तिथेच तिथेच तिथेच बसेन! जय महाराष्ट्र.