अंमली पदार्थ तस्करीत नवी मुंबई पोलिसांचा सहभाग
esakal April 28, 2025 11:45 AM

अमली पदार्थ तस्करीत नवी मुंबई पोलिसांचा सहभाग
तीन पोलिस कर्मचारी ताब्यात; अटकेची कारवाई सुरू

नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : अमली पदार्थांच्या तस्करीत नवी मुंबईतील काही पोलिसांचा सहभाग आढळल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. आरोपी पोलिसांमध्ये अँटी नार्कोटिक्स विभागातील दोन पोलिसांचा तसेच खारघर पोलिस ठाण्यातील एका पोलिसाचा समावेश आढळून आला आहे. विशेष म्हणजे, ज्या अमली पदार्थविरोधी पथकातील पोलिसांनी शहरात अमली पदार्थ तस्करांवर कारवाई करणे अपेक्षित आहेच, त्याच पोलिसांचा अमली पदार्थांच्या तस्करीत आणि विक्रीमध्ये समावेश असल्याचे गुन्हे शाखेला आढळून आले.

बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिंचकर यांनी चार दिवसांपूर्वी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. चिंचकर यांची दोन्ही मुले अमली पदार्थाच्या तस्करीत मुख्य आरोपी होते. तर गेल्या महिन्यात नवी मुंबईत दाखल झालेल्या एका गुन्ह्यात गुरुनाथ यांचा मुलगा धीरज हा मुख्य आरोपी असल्याचे आढळून आले होते. तसेच त्याच्याविरोधात ‘एनसीबी’कडूनदेखील तपास सुरू होता. दोन्ही मुले फरार असल्यामुळे गुरुनाथ चिंचकर याला एनसीबी व नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाकडून चौकशीसाठी वारंवार बोलवण्यात येत होते. या चौकशीला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे गुरुनाथ चिंचकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले होते; परंतु याच गुरुनाथ यांचा मुलगा धीरज व अमली पदार्थविरोधी पथकातील काही पोलिस कर्मचाऱ्यांचे संधान असल्याचे पोलिसांना त्यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटवरून आढळून आले. त्यामुळे हे पोलिस चौकशीच्या घेऱ्यात सापडले. त्यातच या प्रकरणात आणखी किती पोलिसांचा समावेश आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.


पोलिस आयुक्तांच्या मोहिमेला सुरुंग
नवी मुंबई शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अमली पदार्थांची तस्करी व त्यामध्ये असलेले रॅकेट उद्ध्वस्त करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. २०२३मध्ये ड्रग्ज माफियांविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईत ३५३ आरोपींना अटक करून तब्बल २१ कोटी १३ लाखाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. तर नोव्हेंबर २०२४ मध्ये तळोजात केलेल्या कारवाईत दोन नायजेरियन नागरिकांसह पाच कोटी ६२ लाख रुपयांचे मेफेड्रोन व कोकेन जप्त करण्यात आले; मात्र पोलिसांचाच अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग आढळून आल्याने आयुक्तांच्या मोहिमेला सुरुंग लावण्याची चर्चा सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.