पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे संबंध आहे. भारताकडून उचलण्यात आलेल्या पावलांमुळे पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी त्यांचे बंधू नवाझ शरीफ यांची भेट घेतली. त्यांनी दोन्ही देशांमध्ये सध्या असलेली वर्तमान परिस्थितीबद्दलची माहिती त्यांना दिली. त्या भेटीत नवाज शरीफ यांनी लहान भाऊ शहबाज यांना भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मंत्री आणि अन्य नेत्यांनीही कोणतीही वक्तव्य करु नये, असा सल्ला दिला.
रिपोर्टनुसार, रविवारी रात्री शहबाज शरीफ हे नवाझ शरीफ यांच्या भेटीसाठी त्यांचा उमरा निवासस्थानी पोहचले. या भेटीत संपूर्ण रिपोर्ट नवाझ शरीफ यांना शहबाज यांनी दिला. भारताने पाकिस्तानविरोधात कोणकोणती पावले उचलली आहे, त्याची माहिती दिली.
बैठकीत शहबाज शरीफ यांच्याकडून सर्व वृत्तांत ऐकल्यानंतर नवाझ शरीफ यांनी शांत राहण्याचा सल्ला दिला. तणाव निर्माण होईल, असे कोणतेही वक्तव्य मंत्री आणि अन्य नेत्यांनी भारतासंदर्भात करु नये, असे शरीफ यांनी म्हटले. युद्ध झाले तर पाकिस्तानचे सर्वाधिक नुकसान होईल. त्यामुळे शांत राहणे योग्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
शहबाज आणि नवाज यांच्या भेटी दरम्यान उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की, नवाझ शरीफ यांचा प्रयत्न दोन्ही देशांमध्ये संवाद निर्माण करण्याचा आहे. भारताविरोधात कोणतेही आक्रमक धोरण स्वीकारण्यास नवाझ शरीफ तयार नसल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.
भारताने सिंधू करार रद्द केल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होईल, त्याची माहिती शहबाज यांनी नवाझ शरीफ यांना दिली. दोन्ही देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती आहे. त्यावर नवाझ शरीफ यांनी दोन्ही देशांकडे अण्वस्त्र असल्याचे सांगितले. त्यामुळे चर्चेतून मार्ग काढण्याचा सल्ला त्यांनी दिला.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. दहशतवादी आणि दहशतवाद्यांना आश्रय देणारे कधी विसरणार नाही? अशी कारवाई होणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.