Datta Dalvi Joins Eknath Shinde Shiv Sena : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन राजकीय पक्ष आपले डावपेच आखत आहेत. मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत. असे असतानाच आता उद्धव ठाकरे यांना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. महापालिका निवडणूक तोंडावर असताना इथे दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांचे कधीकाळचे विश्वासू आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मुंबई पालिकेवर झेंडा रोवण्यासाठी इतर पक्षांतील महत्त्वाच्या नेत्यांना आपापल्या पक्षात घेतले जात आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी मुंबईत मोठी खेळी खेळली आहे. त्यांनी कधीकाळी बाळासाहेबांच्या तालमीत राजकारणाचं बाळकडू घेतलेल्या दत्ता साळवी यांना शिंदे गटात ओढलं आहे. दत्ता दळवी हे मुंबईचे महापौर राहिलेले असून त्यांची ईशान्य मुंबईत मोठी ताकद आहे. त्यांच्या येण्याने एकनाथ शिंदे यांची मुंबईतील ताकद वाढल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत.
शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर दत्ता दळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. मला आनंद वाटतोय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत येताना मनात कोणतीही शंका-कुशंका किंवा भावना घेऊन आलेलो नाही. मी फक्त जनतेच्या समस्यांचे ओझ खांद्यावर घेऊन आलोय. आमचे प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे नक्की प्रयत्न करतील, याचा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया दत्ता दळवी यांनी दिली. तसेच, महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाचा प्रयत्न प्रलंबित होता, ते काम चालू झाल आहे. विक्रोळीचे अनेक प्रश्न आहेत. स्वतःला काही घेण्यासाठी नव्हे तर देण्यासाठी आलो आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
दत्ता दळवी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेले कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणूनही त्यांची मुंबईच्या राजकारणात ओळख आहे. ते नोव्हेंबर 2023 मध्ये एका आगळ्यावेगळ्या कारणामुळे चर्चेत आले होते. त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना जाहीर भाषणात एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर दळवी यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दळवी यांना पूर्ण ताकदीने पाठिंबा दिला होता.
दत्ता दळवी हे 2005 ते 2007 या काळात मुंबईचे महापौर राहिलेले आहेत. सामान्य शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली होती. त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे ते कमी काळात बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू बनले होते. दरम्यान, आता दत्ता दळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.