मुंबईतील उपनगरी रेल्वे प्रवास हा लाखो प्रवाशांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. लाखो प्रवासी दररोज रेल्वे किंवा लोकलने प्रवास करतात. पण थोडेसेही नियोजन चुकल्यास काय भीषण परिणाम होऊ शकतो, याचे विदारक चित्र आपण परळ-एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीत पाहिले होते. अशीच धोकादायक परिस्थिती सध्या बदलापूर स्थानकावर निर्माण झाली असल्याचं मनसे नेते राजू पाटील यांनी व्हिडिओ शेअर करत निदर्शनास आणले. पाटील यांनी व्हिडिओ शेअर करत रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले.
यांनी बदलापूर स्टेशनवरील प्रवाशांची चेंगराचेंगरी दाखवणारा व्हिडिओ त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्यांनी व्हिडिओ ट्विट करत रेल्वे प्रशासनाला थेट सवाल उपस्थित केला आहे, "तुम्ही कसली वाट पाहताय? @drmmumbaicr" असा सवाल त्यांनी कॅप्शनद्वारे उपस्थित केला आहे.
पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "मुंबई उपनगरची मुख्य वाहिनी म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. या रेल्वे प्रशासनाचे थोडे जरी नियोजन चुकले तर काय परिस्थिती बिघडू शकते, त्याचं विदारक दृश्य परळ एल्फिन्स्टन पुलाच्या चेंगराचेंगरीत संपूर्ण मुंबईने पाहिलं. सध्या बदलापूर होम प्लॅटफॉर्मवर देखील अपघातजन्य परिस्थिती रोज पाहायला मिळते आहे," असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
त्यांनी म्हटलं की, "प्रवाशांचा विचार न करता प्लॅटफॉर्मवर अचानक लावलेले फेन्सिंग आणि चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली उभारणी धोकादायक ठरत आहे. रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे? पुन्हा एखाद्या परळ-एल्फिन्स्टनसारख्या दुर्घटनेची वाट बघताय का?" असा सवाल करत त्यांनी रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.