Pahalgam Attack : काश्मीरमधील ५० पर्यटन स्थळं बंद; पहलगाम हल्ल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय
esakal April 29, 2025 11:45 PM

पहलगामच्या बैसरन व्हॅलीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील अर्ध्याहून जास्त पर्यटन स्थळं बंद करण्यात आली आहेत. जम्मू काश्मीर सरकारने याबाबत निर्णय घेतलाय. व्हॅली आणि सुंदर पर्वतांसाठी ओळखल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमधील जवळपास ५० पर्यटन स्थळं, ट्रेकिंगचे रूट बंद करण्यात आलेत. बडगाममध्ये दूधपात्री आणि अनंतनागमध्ये वेरीनाग यांसारखी पर्यटन स्थळं सामान्यांसाठी बंद केली आहेत.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू काश्मीर सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. ५० ठिकाणं पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. पुरेशी सुरक्षा नसल्याचं कारण सरकारकडून देण्यात आलंय. या ठिकाणांमध्ये वेरीनाग, बंगस खोरं, युसमार्ग रिसॉर्ट यांचा समावेश आहे. जिथं सुरक्षा कडेकोट आहे ती पर्यटन स्थळं सुरू राहतील असं सरकारकडून सांगण्यात आलंय.

बांदीपुरातील गुरेज व्हॅली, बडगाममधील योसमार्ग, तौसी मैदान, दूधपथरी, कुलगाममधील अहरबल, कौसरनाग, कुपवाडातील बंगस, करिवान, चंडिगाम, हंदवाडातील बंगस व्हॅली बंद करण्यात आले आहेतो. सोपोरमधील वूलर, रामपोरा आणि राजपोरा, चेरहर, मुंडिज हमाम मरकूट वॉटरफॉल, खाम्पू, बोस्निया, विजीटॉप, अनंतनागमधील सूर्यमंदिर खीरीबल, वेरीनाग गार्डन, सिन्थन टॉप, मार्गनटॉप, अकाड पार्क, बारामुलातील हब्बा खातून पॉइंट कवंर, बाबारेशी तंगमार्ग, रिंगावली तंगमार्ग, गोगलदारा तंगमार्ग, बेदरकोट तंगमार्ग, श्रुंज, कमानपोस्ट उरी, नामब्लान, इको पार्क ही पर्यटन स्थळं बंद केली आहेत.

पर्यटन हाच जम्मू काश्मीरमध्ये उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. हल्ल्यानंतर पर्यटन क्षेत्रावर प्रचंड परिणाम झालाय. जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आलेले बूकिंग रद्द केले जात आहेत. आठवड्याभरापूर्वी पर्यटकांनी फुललेलं काश्मीर आता ओस पडलंय. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विधानसभेत पहलगाम हल्ल्यावर दु:ख व्यक्त केलं. ते म्हणाले की, काश्मीरचे लोक निरपराध लोकांच्या हत्येविरोधात पुढे आले आहेत. गेल्या दोन दशकात पहिल्यांदा जम्मू काश्मीरचे लोक एखाद्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात इतक्या मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.