बेल्हे, ता. २९ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या ऋतुजा गवांदे व वैष्णवी गणेश यांनी सादर केलेल्या ‘कृषितज्ज्ञ’ या प्रकल्पास आतापर्यंत तालुका, जिल्हा, राज्य व देश पातळीवर विविध ठिकाणी पारितोषिके मिळाली आहेत.
बेल्हे येथील समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे यांनी ही माहिती दिली. अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन बंगलोर व सॅमसंग मुंबई यांच्या वतीने लोणीकंद येथे आयोजित केलेल्या ‘अन्वेषण’ या राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेत ऋतुजा गवांदे व वैष्णवी गणेश यांनी सादर केलेल्या ‘कृषितज्ज्ञ’ या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला. रुपये तीस हजार रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्यांना सन्मानित केले होते.
त्याचप्रमाणे बंगलोर येथे झालेल्या ‘अन्वेषण’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेतदेखील या विद्यार्थ्यांना ‘१०० टाइम्स क्यूरियस क्वेश्चन अॅवॉर्ड तसेच रुपये पाच हजार रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले. खोडद येथील जीएमआरटीमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या प्रकल्प स्पर्धेमध्ये या प्रकल्पास द्वितीय क्रमांक मिळाला. तसेच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक प्रकल्प स्पर्धा ‘सृजन २०२५’ मध्ये यास विशेष पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविले. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे या ठिकाणी टेक्निकली कोस्पॉन्सर्ड बाय आय ट्रिपल इ बॉम्बे सेक्शन यांच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या ‘प्रोटेक २०२५’ या नॅशनल लेवल प्रोजेक्ट अँड पोस्टर कॉम्पिटिशनमध्ये ‘कृषितज्ज्ञ’ या प्रकल्पास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड इनोवेशन, वराळे येथे आयोजित प्रोजेक्ट बेस्ट लर्निंग या प्रकल्प स्पर्धेमध्ये या प्रकल्पास प्रथम क्रमांकाचे पाच हजार रोख व प्रशस्तीपत्रक मिळाले असून, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वडगाव येथे झालेल्या कॉन्व्हेन या प्रकल्प स्पर्धेतही या प्रकल्पास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.