rat29p13.jpg
60651
रत्नागिरीः राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा येथे उभारलेले आंबा विक्री स्टॉल.
rat29p19.jpg-
60688
बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात येणारा आंबा.
ग्राऊंड रिपोर्ट-----लोगो
इंट्रो
कोकणातील हापूस आंब्याच्या खरेदी-विक्रीतून दरवर्षी कोट्यवधीची उलाढाल होते; मात्र, स्थानिक पातळीवर सर्वसोयींनीयुक्त प्रशस्त बाजारपेठेच्या अभावामुळे आंबा विक्रीसाठी परजिल्ह्यातील व्यावसायिकांवर अवलंबून राहावे लागते. त्यात सर्वाधिक हापूसची विक्री मुंबईतील वाशी बाजार समिती, पुणे, अहमदाबाद येथे होते. तिथे ठरवण्यात येणारा दर सर्वत्र लागू होतो. त्यामुळे अनेकवेळा कोकणातील बागायतदार दरावरून असमाधानीच राहतात. ही परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू आहे. अनेक व्यावसायिक हंगामापूर्वी बागायतदारांना आर्थिक मदत करतात. त्यामुळे बागायतदार त्यांच्याकडे आंबा विक्रीसाठी देतात. कोरोनानंतर थेट आंबा विक्रीचा पर्याय पुढे आला; मात्र मोठ्या बागायतदारांना हे अशक्य असल्यामुळे दलालांची साखळी तुटणे अशक्य आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात मोठी बाजारपेठ सुरू करण्याचे आव्हान राहणार आहे....!
- राजेंद्र बाईत, राजापूर
--
हापूसची मदार परजिल्ह्यातील बाजारपेठांवर
वर्षानुवर्षे दलालांचे वर्चस्व; स्थानिक पातळीवर किरकोळ विक्री
मुंबई-गोवा महामार्गावर देशाच्या विविध भागातील पर्यटकांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे महामार्ग हे हापूस आंबा विक्रीचे मोठे माध्यम बनलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर, लांजा, पाली, हातखंबा, चिपळूण, खेड आदी भागात महामार्गावर अनेक शेतकरी, बागायतदार छोटे-छोटे स्टॉल उभारून आंबा विक्री करतात. या ठिकाणी दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल होते. सध्या महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यामुळे या स्टॉलधारकांची पंचाईत झाली असली तरीही पर्यायी व्यवस्था त्या स्टॉलधारकांनी केली आहे. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर दाभोळ येथे सुमारे ६० स्टॉलधारक आंबा विक्री करतात. दिवसाला यामधून काही लाखांची उलाढाल होते. यामुळे वाहतूक, दलाली याची बचत होते तसेच थेट विक्रीमुळे दरही अधिक मिळतो आणि पैसेही रोखीत मिळतात; मात्र ही व्यवस्था छोट्या बागायतदारांना पूरक ठरते. मोठे बागायतदार या पद्धतीने व्यवस्थापन करू शकत नाहीत.
परजिल्ह्यातील बाजारसमित्यांवर अवलंबून
मुंबई, पुणे, सुरत, अहमदाबाद, राजकोट या ठिकाणी कोकणातील हापूसची दलालांद्वारे विक्री होते. मार्च महिन्यात सरासरी एक लाख पेट्या, एप्रिल महिन्यात सरासरी ८ लाख पेट्या तर मे महिन्यात ५ ते ६ लाख पेट्यांची विक्री एकट्या वाशी बाजार समितीमधून होते. या कालावधीत तीनशे कोटीहून अधिक उलाढाल होत असावी, असा अंदाज आहे. दलाल जो दर देतील त्यावर शेतकरी, बागायतदारांना समाधानी राहावे लागते. काहीवेळा पेटीमध्ये दर्जेदार माल असतो; परंतु दलालांकडून शेतकऱ्याला अपेक्षित दर मिळत नाही. दर निश्चितेच्या या प्रक्रियेमध्ये शेतकरी, बागायतदार आणि दलाल यांची विश्वासार्हता महत्वाची असताना दलालाच्या भूमिकेवर शेतकरी, बागायतदार यांना अवलंबून राहावे लागते.
शेतकरी उपाशी, दलाल तुपाशी
प्रतिकूल वातावरण आणि कीडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे हापूसचे उत्पादन कमी होत आहे. त्यात खतपुरवठा, औषध फवारणी यासाठीचा खर्चही वाढत आहे. अशा प्रतिकूल स्थितीशी सामना करत हातामध्ये शिल्लक राहिलेला माल शेतकरी, बागायतदार दलालांकडे विक्रीसाठी पाठवला जातो; मात्र त्या ठिकाणी दलाल जो दर देईल तोच निश्चित असल्याने शेतकऱ्याला अपेक्षित दर मिळत नाही. त्यामध्ये शेतकरी राजा उपाशी आणि दलाल तुपाशी अशी स्थिती अनेकवेळा निर्माण होत असल्याचे बागायतदार सांगतात.
कोरानामुळे मार्केटिंगची नवी साखळी
कोरोना महामारीमध्ये जनजीवन पुरते विस्कळीत झाले होते. हापूस आंब्याची चव अनेकांना हवी होती; मात्र, कोरोनाच्या निर्बंधामुळे घरापर्यंत हापसूची पेटी पोहचणे मुश्किल होते. त्यातून, नवीन मार्केटिंगची साखळी तयार झाली होती. कोरोना महामारीमुळे अनेकांना नोकऱ्या-रोजगार गमवावे लागले होते. रोजगाराच्या शोधार्थ असलेल्या अनेकांनी त्या वेळी घरोघरी आंबा पोहचवण्याची जबाबदारी उचलली होती. हापूसची पेटी थेट ग्राहकापर्यंत पोहचली. त्याचवेळी संबंधिताला रोजगारही मिळाला; मात्र, कोरोनाचा ज्वर कमी होताच पुन्हा सर्वजण नोकरी व्यवसाय सांभाळत स्थिर झाले. त्यातून, दलालाऐवजी थेट घरोघरी हापूसची पेटी पोहचवणारी साखळी संपुष्टात आली अन् ग्राहकापर्यंत हापसूची पेटी पोहचण्यासाठी पुन्हा एकदा दलालाच महत्व प्राप्त झाले.
चौकट
रत्नागिरी बाजार समितीचे असेही प्रयत्न
कृषी उत्पन्न बाजार समिती वा सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन आंबा महोत्सवाचे आयोजन केल्यास त्या द्वारे राज्य-परराज्याच्या विविध भागातील पर्यटक, खवय्ये वा खरेदीदार यांना एकाच व्यासपिठावर कोकणच्या विविध भागातील तयार झालेला हापूस आंबा एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. कोरोना कालावधीनंतर रत्नागिरीत बाजार समितीने सलग दोन वर्षे प्रयत्न केले; मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. यंदाही बाजार समितीने सभापती सुरेश सावंत आणि माजी सभापती गजानन पाटील यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती; परंतु त्याला बागायतदारांचा प्रतिसाद लाभला नाही. काही शेतकऱ्यांनी तर दलालांना आंबा देण्याची कारणेही सांगितली. अनेकवेळा दलालांकडून बागायतदारांना आर्थिक मदत केली जाते. ती रक्कम बागायदार आंबा विक्रीमधून फेडत असतात. त्यामुळे बागायतदार दलालांशी जोडले जातात. या पद्धतीने लागणारे भांडवल बाजार समिती उपलब्ध करून देणार का, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. यंदा ग्लोबल कोकण या संस्थेने दिल्लीमध्ये हापूस आंबा महोत्सव आयोजित केला आहे. त्यामुळे मोठी बाजारपेठ आंबा बागायतदारांना मिळणार आहे. याच धर्तीवर विविध ठिकाणी आंबा महोत्सव आयोजित केले पाहिजेत. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाची पर्यटनस्थळांवर म्हणजेच गणपतीपुळे, दापोली, गुहागर येथे आंबा विक्री महोत्सवांचे आयोजन करणे आवश्यक आहे. या ठिकाणी एप्रिल, मे या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होतात.
चौकट
हापूस आंबा क्षेत्रः ६८ हजार क्षेत्र
हंगामातील आर्थिक उलाढालः ३०० कोटी
महत्वाची मार्केटः वाशी (मुंबई), पुणे, अहमदाबाद, राजकोट, गुजरात
कोट
बाजार समितीमध्ये आंबा विक्रीसाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे महाबळेश्वर, पुणे, बारामती, इंदापूर येथे यावर्षी बागायतदारांना आंबा विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी तेथील लोकांशी चर्चा सुरू आहे.
- पांडुरंग कदम, सचिव, बाजार समिती
कोट
हापूस जगभर प्रसिद्ध आहे; मात्र कोकणात तयार होणाऱ्या हापूसची स्थानिक पातळीवर बाजारपेठ नाही. बाजार समितीने पुढाकार घेऊन आंबा विक्रीचा मोठा बाजार तयार केला पाहिजे. तसे झाल्यास मुंबईतील दलाल रत्नागिरीत येतील आणि उलाढाल येथेच होईल. तसे झाल्यास त्याचा फायदा स्थानिक शेतकरी, बागायतदार, व्यापारी यांना होईल. यामधून रोजगार निर्मितीही होईल.
- विशाल सरफरे, आंबा बागायतदार
कोट
हापूसला चांगला दर मिळावा यासाठी बागायतदार, शेतकरी यांना अनेकवेळा मार्केटमधील व्यापार्यांवर अवलंबून राहावे लागते; मात्र, स्थानिक पातळीवर बाजारपेठ असल्याने शेतकरी, बागायतदार यांना आपल्या मालाचा दर ठरवण्याची संधी मिळेल. त्यातून हापूसला अपेक्षित दर मिळेल.
- प्रितम बाईत, आंबा विक्रेते
कोट
कोकणामध्ये हापूस पिकत असला तरीही बाजारपेठ वाशी, अहमदाबादला आहे. स्थानिक पातळीवर किरकोळ ठिकाणी आंबा विक्री होते. त्या ठिकाणी बऱ्यापैकी स्थानिक नागरिकच खरेदीसाठी जातात. स्थानिक स्तरावर बाजारपेठ झाल्यास वाहतूक खर्च कमी होईल.
- विजय नरसुले, आंबा विक्रेते