नालासोपारा, ता. २९ (बातमीदार) : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नालासोपारा पोलिस सतर्क झाले आहेत. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहारसह अन्य राज्य व परदेशातून नालासोपाऱ्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. नालासोपारा पश्चिमेतील निळेमोरे गाव येथे बांधकाम व अन्य ठिकाणी मजुरीचे काम करणाऱ्या ४० परप्रांतीय नागरिकांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्या नोंदी घेऊन त्यांच्या कागदपत्रांची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची पळापळ सुरू झाली आहे.
‘गरिबांचे शहर नालासोपारा’ अशी ओळख असणाऱ्या नालासोपाऱ्यात ६० टक्के लोक परप्रांतीय वास्तव्यास आहेत. अतिशय दाटीवाटीने वाढलेल्या चाळी, अनधिकृत बांधकाम या परिसरात लोकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. अनेक परप्रांतीय लोक हे बांधकाम व्यावसायिक, मजूर अड्डे याठिकाणी काम करतात, तर नायजेरियन नागरिकही अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये कार्यरत आहेत. याच चाळीच्या वस्तीत अनेक गुन्हेगारी आणि दहशतवादाशी निगडित राहणाऱ्या नागरिकांचे वास्तव्य असण्याची शक्यता पोलिसांना आहे. त्यामुळे नालासोपारा पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत. संशयास्पद वाटणाऱ्या वस्ती, चाळी याठिकाणी छापे टाकून, त्यांना पोलिस ठाण्यात नेऊन, त्यांचे आधार कार्ड, जन्मदाखल्याची तपासणी केली जात आहे.
पोलिस ठाण्यात नोंदी
आमच्या परिसरातील संशयास्पद वाटणाऱ्या ठिकाणी जाऊन आमच्या पोलिसांचे पथक तपासणी करीत आहे. आम्ही रात्री ४० परप्रांतीय नागरिकांना पोलिस ठाण्यात आणून त्यांच्या नोंदी करून घेऊन, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली आहे, असे नालासोपारा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विशाल वळवी यांनी सांगितले.