60742
देशाला वैभवाकडे नेण्यासाठी शक्ती दे
मालवणात शिवरायांना साकडे; हिंदू जागरण मंचतर्फे घोष मानवंदना
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २९ : छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा सातत्याने स्वीकारली पाहिजे. शिवरायांची पूजा करायची असेल तर त्यांचे गुण आत्मसात करायला हवेत. केवळ गुण आत्मसात करून चालणार नाहीत, तर ते प्रकट केले पाहिजेत. हे गुण पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करायला हवेत. हे आपण जेव्हा करू, तेव्हाच छत्रपतींचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल. देशाला परम वैभवापर्यंत नेईपर्यंत स्वस्थ बसणार नाही आणि हे करण्यासाठी हे शिवराया आम्हाला शक्ती दे, असे साकडे हिंदू जागरण मंचचे प्रांत संयोजक अभयराजे जगताप यांनी आपल्या व्याख्यानातून घातले.
जिल्ह्याच्या अभिमानाचे आणि शिवभक्तांच्या श्रद्धेचे ठिकाण म्हणजे किल्ले सिंधुदुर्ग. या किल्ल्यातील जगातील पहिल्या श्री शिवराजेश्वर मंदिरात आज पारंपरिक शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांचा गजर आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करत शिवप्रेमींनी किल्ला परिसर दणाणून सोडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना तीन वर्षांपासून घोष मानवंदना दिली जात आहे. यावर्षीही छत्रपतींना घोष मानवंदना देण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ. अरविंद कुडतरकर, जिल्हा कार्यवाह लवू म्हाडेश्वर, हिंदू जागरण मंचचे प्रांत संयोजक अभयराजे जगताप, प्रा. पवन बांदेकर, ॲड. हेमेंद्र गोवेकर, रत्नाकर कोळंबकर, शिवराजेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष-भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, राजन वराडकर, सरपंच भगवान लुडबे, पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, महिला शहराध्यक्ष चारुशिला आचरेकर, श्रीराज बादेकर, भाऊ सामंत, बबन परुळेकर आदी उपस्थित होते.
श्री. जगताप म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत्वाची शिकवण दिली. महाराजांनी स्वत्वाचे जागरण केले. महाराजांनी प्रचलित असलेले १२५० पारसी शब्द काढून टाकत पंचांगाचा वापर केला. भारतीय दिनदर्शिकेचा वापर केला. त्यामुळे महाराजांचे दिवस, प्रसंग हे आपण तिथीप्रमाणे साजरे करायला हवेत. पुण्यतिथी, राज्याभिषेक, जयंती हेही तिथीप्रमाणेच साजरे केले पाहिजेत. बाराव्या ज्योतिर्लिंगानंतर तेरावे ज्योतिर्लिंग हे रायगड आहे. चौदावे ज्योतिर्लिंग हे संभाजी महाराजांची समाधी आहे. ही दोन ज्योतिर्लिंग झाली म्हणूनच ती बारा ज्योतिर्लिंग टिकली आहेत. त्यामुळे या दोन्ही ज्योतिर्लिंगाची वारी करायला हवी.’ दरम्यान, व्याख्यानानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घोष मानवंदना दिली. त्यानंतर शिवआरती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. यानंतर या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाली.
-------
‘महाराजांची स्वाभिमानी वृत्ती आत्मसात करा’
श्री. जगताप म्हणाले, ‘महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्या. जगदीश्वर मंदिरातील शिलालेखामध्ये ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी राज्याभिषेक झाल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे राज्याभिषेक कोणत्या दिवशी साजरा करायचा, हे आपण ठरवायला हवे. महाराजांची स्वाभिमानी वृत्ती आत्मसात करा. शिवरायांकडे व्यक्ती म्हणून न पाहता एक वृत्ती म्हणून पाहा. त्यांनी कशासाठी काम केले? त्यांचे ध्येय कोणते होते? याचा अभ्यास करा. त्यांची कार्यप्रणाली समजून घ्या.’