Bhandara : उसनवारीने पैसे घेऊन लेकीचं लग्न लावलं, मंडपातच बापाचा मृत्यू
esakal April 30, 2025 05:45 AM

मुलीच्या लग्नासाठी नातेवाईकांकडून उसनवारीने पैसे घेतले. मुलीच्या लग्नासाठी मंडप सजला आणि मुलगी बोहल्यावर चढली. तिच्या डोक्यावर अक्षता टाकल्यानंतर स्टेजवरच तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडलीय. झारली गावात गणेश खरवडे यांचा मुलीच्या लग्न सोहळ्यातच मृत्यू झाला.

गणेश खरवडे हे अल्पभूधारक शेतकरी आहे. अवघी एक एकर शेती असलेल्या गणेश यांनी उसनवारीने पैसे घेऊन लेकीचं लग्न लाऊन दिलं. लाडक्या लेकीचं कन्यादान केल्यानंतर पाहुण्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. त्याचवेळी स्टेजवर गणेश खरवडे यांना हृदयविकाराचा झटका आला.

एका बाजूला लग्न सोहळ्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. नातेवाईकही लग्नाला आले होते. मात्र गणेश यांच्या अशा निधनामुळे लग्नमंडपात शोककळा पसरली. खरवडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

मंगळवारी दुपारी भंडारा शहरात विवाह सोहळा सुरू होता. दुपारी १२ वाजता लग्न लावून दिलं. त्यानंतर स्टेजवरच ते नातेवाईकांसोबत भेटी गाठी करत होते. त्यावेळी अचानक गणेश खरवडे यांच्या छातीत दुखायला लागलं आणि तिथंच कोसळले. मित्र आणि नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं पण अडीच वाजता त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.