आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 45 व्या सामन्यात 29 एप्रिलला दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. कोलकाताने शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात दिल्लीवर 14 धावांनी विजय मिळवला. दिल्लीच्या या पराभवानंतर चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव आणि कोलकाताचा स्फोटक फलंदाज रिंकु सिंह हे दोघेही एकमेकांसह बोलत होते. कुलदीपने या दरम्यान रिंकूला कानाखाली मारली. कुलदीपने रिंकूला तब्बल 2 वेळा कानाखाली लगावली. कुलदीपच्या या अशा कृतीमुळे रिंकूचा चेहरा पडला. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच या प्रकारामुळे नेटकऱ्यांना हरभजन सिंह-एस श्रीसंथ या प्रकरणाची आठवण झाली. हरभजन यानेही श्रीसंथला अनेक वर्षांपूर्वी आयपीएल स्पर्धेत कानाखाली मारली होती.
आयपीएल स्पर्धेत सामन्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू हे परंपरेनुसार एकमेकांसह चर्चा करतात. त्यानुसारच रिंकु आणि कुलदीप हे दोघेही बोलत होते. रिंकू या दरम्यान कोणत्या तरी विषयावरुन जोरजोरात हसू लागला. तेव्हाच कुलदीपने रिंकूला कानशिलात लगावली. मात्र कुलदीपने हे सर्व मस्करीत केलं, असं व्हीडिओ पाहून म्हटलं जात आहे. मात्र रिंकूला हे सर्व आवडलं नाही. रिंकूला कुलदीपकडून हे असं अपेक्षित नव्हतं.
कुलदीपने हा सर्व प्रकार थट्टा मस्करीत केला असला तरी याचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले आहेत. किती काही असलं तरी कुलदीपने रिंकू किंवा इतर कुणावरही हात उगारणं बरोबर नाही, असा नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. एका नेटकऱ्याने तर थेट कुलदीपवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.
रिंकू आणि कुलदीप हे दोघेही चांगले मित्र आहेत. दोघेही टीम इंडियासाठी खेळतात. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये रिंकू आणि कुलदीप उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे दोघेही घनिष्ठ मित्र आहे. मैत्रीत हे असं चालतं. मात्र सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या प्रकरणाचा बाऊ केलाय, असंही म्हटलं जात आहे.
कुलदीपने मर्यादा ओलांडली!
दरम्यान केकेआरने सांघिक खेळीच्या जोरावर दिल्लीसमोर 205 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र प्रत्युत्तरात दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 190 धावांपर्यंतच मजल मारता आली. कोलकाता नाईट रायडर्स टीमने अशापक्रारे 14 धावांनी विजय मिळवला.