‘एसईए’च्या आंदोलनात १०० कर्मचारी
महावितरण, महापारेषणसह महानिर्मिती आदींचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० ः महाराष्ट्रात वीजपुरवठ्याची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमधील अभियंत्यांचे नेतृत्व करणारी सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन ही बलाढ्य संघटना अभियंत्यांच्या हक्कांसाठी सतत लढा देत आहे. सध्या या संस्थेने महावितरण प्रशासनाच्या धोरणांविरोधात राज्यभर आंदोलन सुरू केले असून, त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १०० सहकारीही सहभागी झाले आहेत.
एसईएचे रत्नागिरी येथील पदाधिकाऱ्यांनी सांगितले, महावितरणातील बदली धोरण, कर्मचारी भरती आणि कंपनीच्या पुनर्रचनेबाबत प्रशासन एकतर्फी निर्णय घेत आहे. त्यामध्ये अभियंत्यांना विश्वासात घेतले जात नाही तसेच पारदर्शक धोरणांचा अवलंब केला जात नाही. याचा परिणाम केवळ अभियंत्यांवरच नव्हे तर वीजग्राहकांवरही होणार आहे. या विरोधात १५ एप्रिलपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात अभियंत्यांनी अतिरिक्त कार्यभार सोडणे, महावितरणच्या मोबाइल क्रमांकावरील कॉल कार्यकारी अभियंत्यांच्या क्रमांकावर टाकणे, प्रशासनाचे व्हॉट्सअॅप ग्रुप सोडणे तसेच पेनडाऊन आणि संगणक डाऊन आंदोलनाचा समावेश आहे. रत्नागिरीत वर्षानुवर्षे अभियंत्यांच्या रिक्त जागा असून, या जागांचा अतिरिक्त कार्यभार इतर अभियंत्यांवर टाकला जात आहे. आता या आंदोलनात अभियंत्यांनी हा कार्यभार सोडला आहे तसेच, प्रशासनाला त्यांच्या कार्याची जाणीव व्हावी यासाठी कॉल डायव्हर्टचा मार्ग अवलंबला आहे. हे आंदोलन ग्राहकांविरोधात नसून, वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी अभियंते रात्रंदिवस कार्यरत आहेत. या आंदोलनात रत्नागिरी, संगमेश्वर, देवरूख, लांजा, राजापूर, चिपळूण, खेड, लोटे आदी तालुक्यांतील सुमारे १०० अभियंते सहभागी आहेत.