सांगली : ‘‘केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात सध्या खंडणीखोरांचे साम्राज्य पसरले आहे. त्याला थेट राजाश्रय आहे. अनेक जिल्ह्यांत औद्योगिक वसाहती येत नाहीत, त्यामागे खंडणीखोरांचे रॅकेट हे प्रमुख कारण आहे,’’ अशी टीका माजी मुख्यमंत्री (Prithviraj Chavan) यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘एकेकाळी राज्यात अंडरवर्ल्डचे राज्य होते. त्याचा बऱ्यापैकी बीमोड झाला आहे. आता खंडणीखोरांनी ताबा घेतला आहे. त्याला रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना व्यक्तिशः लक्ष घालावे लागेल. त्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करून तक्रारी थेट या विभागात येतील, अशी व्यवस्था करावी लागेल. राज्य परकीय गुंतवणुकीत आघाडीवर होते. आज उद्योग महाराष्ट्रात यायला धजावत नाहीत. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र (Maharashtra) अकराव्या स्थानी आहे.’’
ते म्हणाले, ‘‘देशात संक्रमक परिस्थिती आहे. पहलगाम हल्ल्यानंतर देशातील सरकार जो निर्णय घेईल, त्याला सर्व पक्षांचा पाठिंबा असेल, असे जाहीर केले आहे. दुसरीकडे, जगात व्यापारयुद्धाची परिस्थिती आहे. भारताने अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता देशाच्या व्यापक हिताचा विचार करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. भारत-अमेरिका व्यापार करारात विरोधकांना विश्वासात घेतले गेले नाही. छोटे देश अमेरिकेच्या भूमिकेला आव्हान देत असताना नरमाई दाखवणे योग्य नाही. हा करार करताना व्यापार, कृषी, उद्योग या तीनही मंत्रालयांचा समावेश असावा, असे माझे मत आहे.’’
‘‘हा देश धर्माच्या नावावर हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करतो आहे. केवळ महामार्ग बनवून विकास होणार नाही, तर शिक्षण, आरोग्य, संशोधन या विषयांवर देश काय करतोय,’’ असा सवाल उपस्थित केला. केंद्र शासनाने जातनिहाय जनगनना करण्याचे जाहीर केले आहे. त्याचे त्यांनी स्वागत केले. काँग्रेसची हीच भूमिका आहे, असे स्पष्ट केले. बिपीन कदम, वीरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
सपकाळांकडून अपेक्षा‘‘काँग्रेसची लढाई विचारांच्या आधारावर आहे. काही जण विकासाच्या नावाखाली निधी व त्यातून ‘टक्केवारी’साठी पक्ष सोडत आहेत; मात्र आम्ही लढत राहू. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारखा तरुण चेहरा प्रदेशाध्यक्षपदी दिला गेला. देशातही काँग्रेस वेगळ्या विचारांने पुढे जात आहे. नक्की बदल घडेल,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.