बेळगाव : महिलांचे आर्थिक सबलीकरण करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने सुरू केलेली महिलांना (Women) वरदान ठरू लागली आहे. मात्र, दरमहा योजनेंतर्गत (Gruhalaxmi Yojana) जमा होणारी २ हजारांची रक्कम वेळेवर जमा होत नसल्याने महिलावर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमधील योजनेची रक्कम शिल्लक राहिली आहे. दरम्यान, या तीन महिन्याची रक्कम मे महिन्यात जमा केली जाणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) यांनी दिली आहे.
मागील महिन्यात मंत्री हेब्बाळकर यांनी, फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याची रक्कम लवकरच जमा होणार आहे, असे सांगितले होते. यामुळे लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला होता. मात्र, ही रक्कम जमा न झाल्याने गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तीन महिन्याची रक्कम मे महिन्यातील प्रत्येक आठवड्यास एक याप्रमाणे ही रक्कम जमा होणार असल्याचे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.
या योजनेंतर्गत महिलावर्गासाठी आर्थिकदृष्ट्या सबलीकरणाच्या उद्देशाने दरमहा २ हजार रुपये सहाय्यधन स्वरूपात देण्यात येत आहेत. सदर रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक महिलांना या रकमेतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासह मुलांचे शिक्षण, शेतीकाम व अन्य उद्योग करण्यास अनुकूल ठरले आहे.
योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यातील सुमारे १ कोटी २३ लाख महिलांना लाभ मिळाला आहे. ही योजना लाभार्थी महिलांना वरदान ठरु लागली आहे. मात्र, दरमहा योजनेची रक्कम वेळेवर जमा होत नसल्याने महिलावर्गातून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. मागील महिन्यात मंत्री हेब्बाळकर यांनी या वर्षातील फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याची रक्कम लवकरच जमा होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्याप रक्कम जमा झाली नसून आता फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तीन महिन्याची रक्कम मे महिन्यात जमा होणार का? याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागून राहिले आहे.