नेहमीचं रूटीन आणि जबाबदाऱ्या यामुळे आपण सगळेच कधी ना कधी दमतो. अशा वेळी कुठेतरी एकट्यानेच फिरायला जाण्याची इच्छा होते, पण भीतीमुळे किंवा संकोचामुळे तो विचार मागे पडतो. मात्र, सोलो ट्रॅव्हल म्हणजे फक्त प्रवास नाही, तर स्वतःला नव्याने समजून घेण्याची एक संधी आहे.
१. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य : एकट्याने प्रवास करताना कोणत्याही बंधनांशिवाय तुम्ही स्वतःचे निर्णय घेता. कुठे जायचं, काय खायचं, किती वेळ थांबायचं हे सगळं तुमच्याच हातात असतं. यामुळे रोजच्या धकाधकीच्या जीवनातून सुटका होते, तणाव कमी होतो आणि मन खऱ्या अर्थाने शांत राहतं.
२. आत्मविश्वासात वाढ : प्रवासादरम्यान अनेक अडचणी येतात जसे की रस्ता शोधणं, अनोळखी लोकांशी संवाद साधणं, निर्णय घेणं. जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी स्वतः हाताळता, तेव्हा तुमचं आत्मभान वाढतं आणि आत्मविश्वास दुणावतो. स्वतःवरचा विश्वास अधिक बळकट होतो.
३. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो : सोलो ट्रॅव्हल करताना वेगवेगळ्या ठिकाणचं वातावरण, तिथल्या लोकांचं वागणं, संस्कृती जवळून पाहायला मिळते. हे अनुभव तुमचं विचारविश्व व्यापक करतात आणि कल्पनाशक्तीलाही चालना मिळते. जगाला नव्या नजरेतून पाहायला शिकवतात.
४. स्वतःशी संवाद साधण्याची संधी : गडबडीतल्या आयुष्यात स्वतःशी संवाद साधायला वेळच मिळत नाही. एकट्याने फिरताना मात्र तुम्हाला स्वतःशी विचार करायला, स्वप्नं पाहायला आणि तुमच्या मनाचा शोध घ्यायला मोकळं वातावरण मिळतं. ही स्वतःशी जुळवून घेण्याची अमूल्य संधी असते.
५. आरोग्यासाठी फायदेशीर : सोलो प्रवासात चालणं, भटकणं हे सहज होतं. यामुळे शरीराला व्यायाम मिळतो, तणाव कमी होतो, झोप सुधारते आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही सुधारते.