नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करताना काँग्रेसने ‘सर्जिकल स्ट्राइक कुठे झाले ते आजतागायत कळलेले नाही?’ अशा शब्दांत पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित केला. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेतील त्रुटींच्या चौकशीची मागणीही करण्यात आली असून ‘गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको काय?’ अशा शब्दांत आडवळणाने गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
जातनिहाय जनगणना आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी करणारे ठराव आज कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संमत करण्यात आले. या ठरावांची माहिती देण्यासाठी सरचिटणीस जयराम रमेश, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट तसेच ओडिशातील काँग्रेस नेते सप्तगिरी उलाका यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यात चरणजितसिंग चन्नी यांनी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सर्जिकल स्ट्राइकवर सवाल उपस्थित केला. पुलवामा हल्ल्यानंतरच्या सर्जिकल स्ट्राइकचा संदर्भ देताना चरणजितसिंग चन्नी म्हणाले, “तेव्हा निवडणुकीदरम्यान खूप बोलले गेले की आम्ही हे केले - ते केले. पण आजपर्यंत हे कळाले नाही की स्ट्राइक कुठे झाले. एखाद्या देशात कुठे बॉम्ब पडला तर कळणार नाही काय? सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानमध्ये कुठेही काही दिसले नाही. कोणालाही काही कळले नाही. मी नेहमीच त्याचे पुरावे मागत आलो आहे.’’
सिंधू करार स्थगितीचा उपयोग नाही ः चन्नी
सिंधू पाणीवाटप कराराला स्थगिती आणि तसेच अन्य निर्णय यांचा फारसा उपयोग झाला नसल्याची टीका चन्नी यांनी केली. ते म्हणाले की सरकारने आपल्या नागरिकांना परत बोलावले आणि इथे आलेल्यांना परत पाठविले. त्याचा काय फायदा झाला? वाघा बॉर्डर बंद केली ती तर दहा वर्षांपासून बंद होती. पाकिस्तानशी इतर देशांमार्फत होणारा व्यापार अदानींकडे गेला आहे. पाकिस्तानचे पाणी रोखणे सध्या तरी शक्य नाही. यासाठी दहा वर्षांचा कालावधी लागेल, त्यासाठी बरेच पैसे खर्च होतील तरीही केवळ २० टक्केच पाणी वाचविता येईल. प्रमुख नद्यांचा प्रवाह पाकिस्तानकडे आहे त्यामुळे याचा काहीही उपयोग होणार नाही.
अधिवेशन बोलवाच
जयराम म्हणाले यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. तसेच पाकिस्तानविरुद्ध काय कारवाई करणार? हे केंद्र सरकारने सांगितले नसून पंतप्रधान आणि सर्व मंत्री देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काँग्रेस पक्षाला लक्ष्य करत आहेत अशी टीका त्यांनी केली. तत्पूर्वी, याच बैठकीत पक्षाध्यक्ष खर्गे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना धडा शिकविण्यासाठी सरकारला सर्वप्रकारचा पाठिंबा कॉंग्रेसने दिला असून सरकारची स्पष्ट रणनीती अद्याप समोर आलेली नाही, अशी टिपणी केली.
सैन्यदलांना सूट दिली असली तरी आदेश केंद्र सरकारच देईल. पंतप्रधान किंवा संरक्षणमंत्र्यांनीच (कारवाईचे) आदेश द्यायला हवेत. बळी पडलेल्या २६ लोकांना न्याय कधी मिळेल? सुरक्षेतील त्रुटींची चौकशी कधी होणार? गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको का?
- भूपेश बघेल, काँग्रेसचे नेते
संसदेवरील हल्ल्यानंतर तत्कालीन वाजपेयी सरकारला कॉंग्रेसने कारवाईसाठी पाठिंबा दिला होता. आज पहलगाम हल्ल्यानंतर खर्गे, राहुल गांधींनीही सरकारला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी १४० कोटी जनतेचे समाधान होईल अशी कारवाई करावी.
- सचिन पायलट, काँग्रेसचे नेते