मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून आज (शनिवारी, ता-2) महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांच्या या यादीत शरद पवारांचं नाव अग्रस्थानी आहे. 1999 साली शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत स्वत:चा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. पक्षाच्या एक तृतीयांश आमदारांसोबत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा ठोकला. त्यानंतर या प्रकरणी न्यायलयात दाद मागण्यात आली, अशातच आता त्याच स्थापन केलेल्या राष्ट्रवादीचा सत्कार शरद पवार स्वीकारणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनाही सत्काराचं निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र उद्धव ठाकरेंची साथ सोडत महायुतीसोबत गेलेल्या अजित पवारांच्या पक्षाकडून ठाकरे सत्कार स्वीकारणार का याची उत्सुकता आहे. तसंच एकनाथ शिंदेही माजी मुख्यमंत्री असल्यानं त्यांचाही सत्कार करण्यात येईल. त्यामुळे शिवसेना पक्षावर दावा केलेल्या शिंदेंसोबत उद्धव ठाकरे स्टेज शेअर करणार का हे देखील पहाणं महत्त्वाचं असणार आहे.
दरम्यान या कार्यक्रमाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. अजित पवार आणि शरद पवार यांनी याआधी देखील अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे. ते एका मंचावर, एका कार्यक्रमासाठी अनेकदा एकत्र आल्याचे दिसून आले आहे. त्यांनी साताऱ्यामध्ये एका बैठकीला शेजारी- शेजारी बसलेला आणि शरद पवारांनी अजित पवारांना बैठकीत आकडेवारी वाचताना मदत केल्याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावरती मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. मात्र दुसरीकडे शिवसेना पक्ष फुटल्यापासून ते आत्तापर्यंत एकदाही एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झालेली दिसली नाही. त्याचबरोबर त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनावेळी एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे एकमेकांच्या समोरून गेले. मात्र, त्यांनी एकमेकांना इग्नोर केल्याचं दिसून आलं होतं. मात्र, आजच्या या कार्यक्रमाच्या आणि सत्कार समाप्रंरमुभाच्या निमित्ताने पुन्हा फुटलेल्या पक्षाचे प्रमुख एकत्रित उपस्थित राहणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
नुकतंच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशामध्ये अजित पवारांनी अर्थसंकल्प जाहीर केला. त्याच दिवशी विधानभवनाच्या परिसरामध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांशी बोलताना दिसून आले, त्यांनी हस्तांदोलन केलं, एकमेकांना नमस्कार केला. मात्र, त्याच वेळेला फडणवीसांच्या मागून एकनाथ शिंदे हे सुद्धा चाललेले होते, मात्र एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं सुद्धा नाही. देवेंद्र फडणवीसांना भेटून पुढे जाताना उध्दव ठाकरे यांनी देखील एकनाथ शिंदेंना इग्नोर केल्याचं दिसून आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिले देखील नाही, आणि फडणवीसांच्या मागोमाग लगेच एकनाथ शिंदे देखील तिथून पुढे निघून गेले. मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हे नेते एकाच मंचावर येणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=otzynj2qxpg
अधिक पाहा..