अंजिरामुळे 'खोर' ला गोडी
esakal May 04, 2025 01:45 PM

- प्रकाश शेलार, prakashshelar.lok@gmail.com

दौंड तालुक्यातील सर्वाधिक दुष्काळी गाव म्हणून खोर एकेकाळी ओळखले जायचे. दर उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी पाणी तर सोडाच पण पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष करावा लागायचा. पिढ्यानंपिढ्या दुष्काळ पाचवीला पुजला असल्याने गावातील युवकांना लग्न जमवण्यासाठी अडचणी यायच्या.

मात्र १५ वर्षांपूर्वी गावातील तरुणाई एकत्र आली. सर्वप्रथम दुष्काळावर मात करण्यासाठी बंधारे, नालाबंदिस्ती, ओढा खोलीकरण, शेततळी आदी उपक्रम राबवण्यात आले. जनाई शिरसाई व पुरंदर उपसा योजनेचे पाणी परिसरातील शेतीसाठी खेळवण्यात आले.

या बदलामुळे पुणे सोलापूर महामार्गापासून दक्षिणेला आठ किलोमीटर अंतरावरील डोंगररांगांच्या कुशीमध्ये दौंड, पुरंदर व बारामती तालुक्याच्या सीमेवर खोर गावाने दुष्काळी गावाचा शिक्का पुसला. खोर गावाने पुणे जिल्ह्यामध्ये अंजिराचे गाव म्हणून लौकिक मिळवला आहे. आज गावाने पर्यटन, उद्योग, मनोरंजन, कृषी क्षेत्राला भुरळ घातली आहे.

परिसरामध्ये १२ वाड्या व तेरावे खोर गावठाण असा गावाचा भौगोलिक विस्तार आहे. गावचे क्षेत्रफळ दोन हजार ५५१ हेक्टर आहे. लोकसंख्या सात हजारांच्यावर आहे. गावामध्ये १६ मंदिरे असून लोकसहभागातून प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. वर्षभरात गावात पाच अखंड हरिनाम सप्ताह असतात.

माजी खासदार वंदना चव्हाण यांनी या गावाला आदर्श सांसद ग्राम म्हणून दत्तक घेतले होते. सुसज्ज ग्रामपंचायत, सोसायटी गावाच्या वैभवामध्ये भर घालतात. गावामध्ये एका निसर्ग पर्यटन केंद्राच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सरपंच नामदेव चौधरी यांनी भैरवनाथ विद्यालय या शैक्षणिक संकुलाची स्थापना केली. गावामध्ये महिलांसाठी अस्मिता भवन आहे. दरवर्षी गावची यात्रा होळीच्या नंतर नवव्या दिवशी भरते.

दौंडचे आमदार राहुल कुल यांनी जनाई शिरसाई व पुरंदर उपसाचे पाणी गावामध्ये आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. आज गावामध्ये ८३ शेततळी आहेत. चार मोठे तलाव व ओढ्यांवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभारण्यात आले आहेत. बांधबंदिस्ती, शोषखड्डे, विहिरी पुनर्भरण, शिरपूर पॅटर्नचे बंधारे उभारत गावाने दुष्काळावर मात केली आहे.

एकेकाळी इथले ग्रामस्थ रोजगार हमी योजनेवर काम करायचे. अनेक जण चारचाकी गाडीवर चालक व वाहक म्हणून काम करायचे. आज इथल्या ग्रामस्थांनी गावामध्ये व गावाबाहेर १८० छोटे मोठे व्यवसाय सुरू केले आहेत.

यामध्ये सुहास चौधरी, विठ्ठल चौधरी, संजय चौधरी, नामदेव चौधरी, अनिल चौधरी, बाळासाहेब चौधरी, अजित डोंबे, गणेश सणस, सागर सणस यांनी नर्सरी, तसेच अनेक छोटे -मोठे व्यवसाय उभारले आहेत. शंकर चौधरी, राम लवांडे या युवकांनी स्पर्धा परीक्षा देत अधिकारी पदाला गवसणी घातली आहे.

गावामध्ये १६ पोल्ट्री फार्म व गाईंचे ६८ मोठे गोठे आहेत. गावामध्ये व गावच्या वेशीवर पाच कंपन्या सुरू झाल्याने रोजगाराच्या संधी डोकावू लागल्या आहेत. शेजारील पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळाच्या चाहूलीमुळे शेत जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. गावामध्ये प्लॉटिंग सुरू झाले आहे.

१९८० व १९९० च्या दशकामध्ये खोर येथील पिकवलेले खारे वांगे मुंबईतल्या बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी जायचे. काही वर्षांनी गावातील काही शेतकऱ्यांनी डोंबेवाडी परिसरात अंजीर शेती करण्याचा निर्णय घेतला. स्वतःची अभियंत्याची नोकरी सोडून युवक समीर डोंबे याने अंजीर शेती करण्याचा अभिनय प्रयोग केला. या प्रयोगाला कमालीचे यश आले.

समीर डोंबे यांना राज्य शासन व नामांकित संस्थांचे आजतागायत २० पुरस्कार मिळाले आहेत. अंजीर पिकविणारे खोर हे दौंड तालुक्यातील एकमेव गाव आहे. माजी सरपंच ज्ञानेश्वर चौधरी यांनी एक वर्षामध्ये आठ कोटींची कामे केली. चौधरी यांना खासदार सुप्रिया सुळे व माजी जिल्हा परिषद सदस्या राणी शेळके यांनी निधी दिला.

यामध्ये जलसंधारण, पिण्याचे पाणी पुरवठा योजना, सरकारी दवाखाना, शेतीसाठी पाणी याचा समावेश आहे. याशिवाय सरपंच वैशाली अडसूळ, माजी सरपंच रामभाऊ चौधरी, सुभाष चौधरी, दिलीप डोंबे, शिवाजी पिसे, बाळासाहेब चौधरी यांनी गावच्या विकासासाठी योगदान दिले.

विकास चौधरी यांनी २००५ मध्ये शशांक फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड, आरोग्य शिबिर, गरजूंना शैक्षणिक मदत, ग्रीन फील्ड तयार करणे, ऐतिहासिक वास्तू सुशोभीकरण आदी उपक्रम राबवले जातात.

गावामध्ये तरुण युवकांना प्रेमासाठी धर्मवीर संभाजीराजे कुस्ती संकुलाची स्थापना करण्यात आली आहे. चालू वर्षी पैलवान सागर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली खोर गावाने यात्रेनिमित्त पुणे ग्रामीणमध्ये सर्वात मोठ्या कुस्ती आखाड्याचे आयोजन केले होते.

अंजीर शेतीला अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे. माजी कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, कृषी सरसंचालक दत्तात्रेय गवसाने, एकनाथ ढवळे, धीरज कुमार आदी अधिकाऱ्यांनी खोर गावाला यापूर्वी भेटी दिली आहे. तसेच नेदरलँड येथील पथकाने भेट दिली आहे.

बारामती कृषी विज्ञान व अनेक शालेय विद्यार्थी अंजीर शेतीचा अभ्यास करण्यासाठी महिनाभरातून एकदा खोरला उपस्थित असतात. एकूणच आधुनिक अंजीर शेतीमुळे खोर गावाचे महत्व महाराष्ट्रभर वाढल्याचे अधोरेखित होत आहे.

खोर गावामध्ये ३२ आजी-माजी सैनिक आहेत. दर स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाला या सैनिकांना ध्वजावंदनाचा मान दिला जातो. गावामध्ये वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. येथील अनेक युवक कीर्तनकार संपूर्ण महाराष्ट्रभर समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत.

कीर्तनकार प्रवीण महाराज चौधरी यांच्या प्रयत्नातून पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी भक्तनिवास बांधण्यासाठी गाव व परिसर एकवटला आहे. गावातील १५ विद्यार्थी आळंदी येथे अध्यात्माचे धडे येत आहेत. गावचे ग्रामदैवत काळभैरवनाथ आहे. सामाजिक सलोखा जपताना गावातील पीर देवस्थान हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे.

गावाशेजारी मयुरेश्वर अभयारण्य असल्याने येथील पशु पक्षांना ग्रामस्थांच्या वतीने प्रत्येक उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. गावातील समीक्षा चौधरी या महिला कुस्तीपटूने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपद पटकावले आहे.

खोरपासून हाकेच्या अंतरावर पुरंदर विमानतळ होत आहे. या विमानतळामुळे अर्थातच खोर गावचे अर्थकारण बदलणार आहे. याशिवाय खोर व देऊळगाव गाडा परिसरात एमआयडीसी करण्याचा आमदार राहुल कुल यांचा मानस आहे.

भविष्यात एमआयडीसी व विमानतळ झाल्यास अनेक रोजगाराच्या व व्यवसायाच्या संधी येथील युवकांना प्राप्त होणार आहे. हे सर्व शक्य झाल्यास भविष्यामध्ये पुणे जिल्ह्यातील दुष्काळी गाव ते प्रगतशील गाव असा खोरचा प्रवास संस्मरणीय ठरणार आहे एवढे मात्र नक्की!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.