03781
प्रदूषण मुक्तीसाठी झेडएलडी पूर्ण करा
सिद्धेश कदम; उद्योजकांच्या बैठकीत सूचना
नागाव, ता. ३ : ‘‘प्रदूषणमुक्त होण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळ, सीईटीपी व टेक्स्टाईल इंडस्ट्रीज उद्योजकांनी एकत्रितपणे झेडएलडी (झिरो लिक्विड डिस्चार्ज ) लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे,’’ आशा सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबईचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिल्या.
कोल्हापूरच्या औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी व सामूहिक सांडपाणी संयंत्रणा प्रकल्प अधिकारी यांची नुकतीच संयुक्त बैठक झाली. बैठकीत उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू, अशी ग्वाही सिद्धेश कदम यांनी दिली. यावेळी पर्यावरणीय संमती प्रक्रिया ( कन्सेंट ) उद्योगांना पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार पद्धतीने चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र सध्याच्या प्रक्रियेमुळे अनेक उद्योगांना अनावश्यक विलंब आणि अडचणी येत आहेत. उद्योगाची स्थापना आणि संचालन करण्यासाठी संमती प्रक्रिया जलद करावी यामुळे उद्योगांना अनावश्यक विलंब न करता कामकाज सुरू करता येईल. तसेच कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात फौड्री उद्योग आहे. उप-प्रादेशिक अधिकारी यांना १० कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीसह ओरेंज श्रेणीतील उद्योगांसाठी कन्सेंट देण्याचे अधिकार द्यावेत अशा मागणीसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संबंधित उद्योजकांच्या विविध समस्याचे निवेदन देण्यात आले. बैठकीस स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, शेखर कुसाळे, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, गोशिमा अध्यक्ष स्वरूप कदम, अमृतराव यादव, सतीश भुतडा, अरुण गोंदकर, बी. डी. मुदगेकर, सुनिल जाधव, कुंडलिक चौगुले आदी उपस्थित होते.