पुण्यात एका तरूणासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका उच्चभ्रू तरुणाची सायबर चोरट्यांनी तब्बल ४२ लाख ९५ हजार ६३७ रुपये लुबाडले आहेत. तरुणावर सीबीआयचे ५० खटले दाखल असल्याची बतावणी करत, लाखो रूपयांना गंडा घातला आहे. या संदर्भात तरूणाने बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय तक्रारदार तरुण स्काईप अॅप वापरत होता. २ सप्टेंबर २०२४ रोजी त्याला एका अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. त्या व्यक्तीने स्वत:ला दिल्लीच्या केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवले. या चोरट्यांनी तक्रारदाराच्या नावावर दिल्लीत ५० खटले दाखल असल्याची धमकी दिली आणि सीबीआय अधिकारी शोध घेत असल्याचे सांगून घाबरवले.
यानंतर चोरट्यांनी तक्रारदाराकडून आधार कार्ड क्रमांक विचारून खात्री केल्याचे नाटक केले. फिर्यादीने काहीच गैरप्रकार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही, चोरट्यांनी बँक खात्याची माहिती मागून, खात्यातील रक्कम शहानिशासाठी दुसऱ्या खात्यावर ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले.
त्या व्यक्तीने चोरट्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून विविध बँक खात्यांमध्ये ₹४२,९५,६३७ ट्रान्स्फर केले. पैसे गेल्यानंतर स्काईपवरून संपर्क थांबला आणि आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. यानंतर त्याने स्काईपवरील व्यक्तीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून बाणेर पोलिस ठाण्यात स्काईप वापरणाऱ्या मोबाईल क्रमांकधारक आणि इतर बँक खातेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.