'वेव्हज्'मध्ये स्टार्टअप उपक्रमाचा यशस्वी प्रारंभ
esakal May 05, 2025 01:45 AM

‘वेव्हज्’मध्ये स्टार्टअप उपक्रमाचा यशस्वी प्रारंभ
मनोरंजन आणि माध्यमे क्षेत्रातील नवउद्यमींसाठी मोठी संधी

मुंबई, ता.४ : ‘वेव्हज् २०२५’ ही परिषद नवोन्मेष, उद्योजकता आणि गुंतवणूक यांचा संगम साधणारा असून, मनोरंजन आणि माध्यमे (एम अँड ई) क्षेत्रातील स्टार्टअप्सना राष्ट्रीय स्तरावर त्यांची कल्पना साकारण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसंचालक आशुतोष मोहळे यांनी ‘वेव्हज्’ची संकल्पना स्पष्ट करताना सांगितले, ‘या उपक्रमाचा उद्देश एम अँड ई क्षेत्रातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणे आणि त्यांना त्यांच्या कल्पनांना मोठे स्वरूप देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक व्यासपीठ निर्माण करणे हा आहे. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचे मुख्य विकास अधिकारी संदीप झिंग्रान यांनी या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ‘आम्हाला एक हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले. यापैकी ३० स्टार्टअप्सनी थेट गुंतवणूकदारांसमोर त्यांची कल्पना सादर केली आणि त्यापैकी निम्म्याहून अधिक जण सध्या सक्रिय चर्चा करीत आहेत.’

गुंतवणूकदारांनीही या उपक्रमाच्या संभाव्य बदलांवर आपले मत व्यक्त केले. वॉर्मअप व्हेंचर्सचे व्हेन्यू पार्टनर राजेश जोशी यांनी एका स्टार्टअप संस्थेचे संस्थापक ते गुंतवणूकदार असा त्यांचा प्रवास या वेळी उलगडला. ‘सीएबीआयएल’चे संस्थापक मुस्तफा हारनेसवाला यांनी या क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत सांगितले, ‘अनेक जण मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात गुंतवणूक करण्यास कचरतात. वेव्हज् ही मानसिकता बदलत आहे. आम्ही आता एम अँड ई साठी एक समर्पित एंजल नेटवर्क तयार करण्यावर काम करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सरकारांसोबत सहकार्य करून जागतिक स्तरावर संबंध जोडण्याचाही विचार करीत आहोत.’ एकंदरीत वेव्हज् २०२५ हा एम अँड ई क्षेत्रातील स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये एक महत्त्वपूर्ण बदल घडवणारा उपक्रम ठरत आहे, जो जुन्या सीमा तोडून भारतातील नवउद्यमींसाठी नवीन संधी निर्माण करीत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.