गगनचुंबी इमारतींच्या पुनर्विकासाचे भविष्य अंधारात
esakal May 05, 2025 01:45 AM

गगनचुंबी इमारतींच्या पुनर्विकासाचे भविष्य अंधारात
- एफएसआयच्या अतिवापराबाबत तज्ज्ञांकडून चिंता; नव्याने बांधकाम करणे रहिवाशांच्या आवाक्यबाहेर, विकसक पाठ फिरवणार
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : सध्या मुंबईतील झोपडपट्टीसह जुन्या कमी उंचीच्या इमारतीला मिळणाऱ्या एफएसआयच्या जोरावर पुनर्विकास केला जात आहे. तसेच विकसक वेगवेगळ्या मार्गांनी वाढीव एफएसआय वापरून गगनचुंबी टॉवर उभारत आहेत. पण या गगनचुंबी इमारती चार-पाच दशकांनंतर जुन्या होतील. त्या नव्याने बांधणे किंवा पुनर्विकास करणे रहिवाशांना शक्य होईल का, आधीच वाढीव एफएसआय वापरला असल्याने विकसक पुनर्विकासाकरिता पुढे येणार का, हे प्रश्न आहेत. त्यामुळे एफएसआयच्या अति वापराबाबत आणि भविष्यातील गगनचुंबी इमारतीच्या पुनर्विकासाबाबत तज्ज्ञांकडून विविध मते व्यक्त होत आहेत.
मुंबईतील घरांची मागणी झपाट्याने वाढत असून, प्रत्येकालाच येथे घर हवे आहे. मुंबईला तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेले असल्याने येथे जागेची कमतरता आहे. त्यामुळे घरांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी विकसक उपलब्ध जागेवर पुनर्विकास प्रकल्प राबवून मूळ रहिवाशांना घरे देण्याबरोबरच विक्रीयोग्य घरे उभारत आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त चटई क्षेत्रफळ निर्देशांक (एफएसआय) वापरून बांधकाम केले जात आहे. त्यामुळे गगनचुंबी इमारती उभारत असल्या तरी या इमारती जेव्हा जुन्या होतील तेव्हा त्याचा पुनर्विकास कसा करणार, हा प्रश्न उभा राहणार असल्याची चिंता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

एफएसआयबाबत ठोस धोरण हवे
पुनर्विकासाच्या नावाखाली सरकार आज वाढीव एफएसआय देत आहे. विकासक वेगवेगळ्या मार्गाने जास्तीत जास्त एफएसआय वापरून गगनचुंबी टॉवर उभारत आहेत. त्यामुळे भविष्यात त्या जागेवर पुनर्विकास प्रकल्प राबवायची वेळ येईल तेव्हा तो कोण करेल, रहिवासी करू शकतील का, पुरेसा एफएसआय नसेल तर विकसक पुढे येईल का, याबाबतचा विचार करून सरकारने एफएसआय वापराबाबत ठोस धोरण, आराखडा तयार करायला हवा, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मुंबईत कुठे, किती एफएसआय मिळतो
- मुंबई शहर - ३ एफएसआय
- विशेष प्रकल्पांसाठी ४ एफएसआय
- उपनगर - २.५ ते ३ एफएसआय
- बीकेसी - ४ एफएसआय
- याशिवाय वेगवेगळ्या निकषांच्या आधारे वाढीव एफएसआय मिळू शकतो.

मुंबईत आज एफएसआयच्या आधारे गगनचुंबी इमारती उभ्या राहत असल्या तरी तेथील पायाभूत सुविधा, भविष्यातील परिस्थिती याबाबत कोणालाच काही पडलेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस शहराची परिस्थिती बिकट होत असून, त्याचा विचार होताना दिसत नाही.
- चंद्रशेखर प्रभू, ज्येष्ठ वास्तुविशारद

प्रत्येक शहराचा नियोजनबद्ध विकास व्हायला हवा, पण मुंबईच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही. आधी चाळींच्या जागी सात-नऊ मजली इमारती आल्या. त्याजागी आता तीस-चाळीस मजली टॉवर होत आहेत. पण त्या ठिकाणच्या पायाभूत सुविधांचे काय? त्या वाढताना दिसत नाहीत. त्यामुळे मुंबईच्या पुनर्विकासाचे भविष्य अंधारात असल्याचे दिसत आहे.
- राजीव मिश्रा, ज्येष्ठ वास्तुविशारद, नगर रचनाकर

आज चाळींच्या जागी पुनर्विकासाच्या माध्यमातून उंच इमारती उभा राहत आहेत. पण या इमारती जेव्हा जुन्या होतील तेव्हा त्याचा पुनर्विकास कोण, कसा करणार हा प्रश्न आहे. त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी सरकार, पालिकेने वाढीव एफएसआयची खिरापत न वाटता भविष्याचा विचार करून पुनर्विकास मार्गी लावावा, पायाभूत सुविधा उभराव्यात.
- ॲड. गॉडफ्रे पिमेंटा, सामाजिक कार्यकर्ते

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.