वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे होत आहे. या प्रकरणी आज कोर्टात सुनावणी झाली आहे. तसेच यातील आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. तर दुसरीकडे सुनावणीदरम्यान राजेंद्र हगवणे यांचे वकील विपुल दुशिंग यांनी धक्कादायक दावे केले आहे. यामुळे आता वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावर चर्चा होत आहे. तिने दुसऱ्या कुणामुळे आत्महत्या केली असा दावा करण्यात आला आहे. याबाबत वकिलांनी तो व्यक्ती कोण आहे, याची माहिती दिली आहे.
पोलिसांनी न्यायालयाला रिमांडमधून अनेक मुद्दे दिले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी लता आणि करिश्मा यांचे मोबाईल गायब केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या मोबाईलमध्ये शशांक हगवणे आणि वैष्णवी हगवणे यांच्यातील चॅट्स, तसेच मारहाणीचे व्हिडिओ किंवा इतर पुरावे असण्याची शक्यता आहे. निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे हे वैष्णवीला सतत मानसिक त्रास देत होते, असे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले आहे.
निलेश चव्हाण फरार असून राज्यभर आणि देशभर शोध सुरु आहे. लता, करिष्मा, सुशील यांचे मोबाईल शोधून जप्त करायचे आहेत. निलेश आणि सुशील यांचे व्हॉट्सॲप चॅट्स देखील तपासात महत्त्वाचे आहेत. या माध्यमातून मारहाण, धमकी, मानसिक त्रासाचे स्पष्ट पुरावे पोलिसांना मिळू शकतात. सर्व खाजगी बँकेत सोने गहाण ठेवले असल्याचे उघड झाले आहे. नेमकं ते कर्ज कोणाच्या नावावर आहे, पैसे कुणाच्या खात्यावर गेले – हे शोधणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोपींचे बँक खाते आणि लॉकर गोठवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे.
तर आरोपींचे वकील यांनी कोर्टात एक अजब दावा केला आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे. त्यांनी कोर्टात सांगितले की, वैष्णवी दुसऱ्या एका व्यक्तीशी चॅट करत होती. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. चॅट करणाऱ्या व्यक्तीने त्रास दिला असावा. म्हणून तिने आत्महत्या केली असावी, असा दावा त्यांनी कोर्टात केला आहे. यावर दाव्यावर बोलताना आरोपीच्या वकिलांनी त्या व्यक्तीविषयी माहिती दिली आहे.
राजेंद्र हगवणे यांचे वकील विपुल दुशिंग म्हणाले की, हगवणे यांनी दिलेले महत्त्वाचे पुरावे यावरती मी युक्तिवाद केला आहे. पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये. कोणाचे चारित्र्य हनन होईल, असा युक्तिवाद आम्ही केला नाही. वैष्णवी हगवणेला आत्महत्या करायला हगवणेंनी भाग पाडलं नाही. ज्या व्यक्तीशी ती चॅट करत होती, त्या व्यक्तीचा साखरपुडा 18 तारखेला झाला आहे. त्या व्यक्ती संदर्भात आम्ही माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा. अशी धक्कादायक माहिती त्यांनी सांगितली आहे.
ते पुढे म्हणाले की, गहाण ठेवले ते सोनं कुठल्या बँकेत आहे हे हगवणे यांनी आधीच सांगितलं आहे. ते उद्योजक आहेत. त्यासाठी त्यांनी सोनं बँकेत गहाण ठेवलं. वैष्णवी तिने तिच्या वडिलांकडे तिचा हक्क सोडपत्र याआधीच दिलेलं आहे. तेव्हा हगवणे यांनी पूर्ण मदत वैष्णवीच्या आई-वडिलांना केली होती. आम्ही सुप्रीम कोर्टाचा न्याय निवाडा कोर्टासमोर दिला आहे. वैष्णवीच्या जाण्याने जेवढे दुःख कस्पटे यांना झाला आहे तेवढेच दुःख आम्हालाही झालं आहे.