पशुसंवर्धनाच्या योजनांसाठी पशुपालकांना आवाहन
पालघर, ता. ४ (बातमीदार) : जिल्ह्यातील पशुपालकांना दूध उत्पादन, शेतीपूरक व्यवसाय व स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विविध वैयक्तिक लाभाच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक लाभार्थ्यांनी www.mahabms.com या संकेतस्थळावर किंवा प्ले स्टोअरवरील ‘AH-MAHABMS’ या मोबाईल अॅपद्वारे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर यांनी केले आहे.
या योजनांतर्गत दुधाळ गायी-म्हशी, शेळी-मेंढी, १००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या पालनासाठी शेड उभारणीस अनुदान, १०० एकदिवसीय कुक्कुट पक्ष्यांचे वाटप, या योजनांचे अर्ज २ मे ते ५ जून या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहेत. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत ८ जून ते १५ जूनपर्यंत आहे.
प्रत्येक पंचायत समितीच्या स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, हे अधिकारी लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज, दस्तावेज सादरीकरण व योजनेबाबत मार्गदर्शन करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.