भिवंडी, ता.४(बातमीदार): औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या भिवंडी शहरात अरुंद रस्ते, बेशिस्त वाहनचालकांबरोबर बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे कोंडी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची सूचना आमदार महेश चौगुले यांनी वाहतूक नियंत्रण विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
भिवंडी शहरातील मुख्य वाहतुकीच्या मार्गावर वाहतूक पोलीस हजर नसतात. शहरात अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा नाही. तर ज्या ठिकाणी यंत्रणा आहे तिथे वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नाही. शहरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे काम सुरु आहे. तोपर्यंत बेशिस्त वाहनांवर कारवाई करून वाहतूक कोंडी दूर केली पाहिजे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर व महत्त्वाच्या चौकांमध्ये कडक पेट्रोलिंग अत्यावश्यक आहे. वंजारपटी नाका व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रिक्षाचालकांकडून बेशिस्तपणे रिक्षा उभी करून वाहतूक कोंडी केली जाते. यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. या मार्गावरील हॉटेल्स व फिटनेस सेंटर्सचे ग्राहक, मोटरसायकल शोरूम्सचे मालक रस्त्यावर बेकायदा वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीसाठी रस्ते लहान होऊन वाहतूक कोंडी होत आहे. तर बागे फिर्दोस परिसरात मुख्य महामार्गावर दुभाजक नसल्याने उलटसुलट वाहतूक करीत आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यामुळे भिवंडी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तातडीने, प्रभावी उपाययोजना करावी, अशी सूचना आमदार चौगुले यांनी वाहतूक अधिकाऱ्यांना केली.